
पुणे : सत्तेच्या संघर्षातून जन्माला आलेली आणि सूडाच्या आगीत आकार घेतलेली कहाणी घेऊन आलेला मराठी अॅक्शन-ड्रामा-थ्रिलर चित्रपट ‘सुड शकारंभ’ अखेर १६ जानेवारी २०२६ रोजी महाराष्ट्रभर प्रदर्शित झाला असून, प्रदर्शना पासूनच या चित्रपटाला प्रेक्षकांचा उत्कृष्ट प्रतिसाद मिळत आहे. ज्योती पाटील प्रस्तुत आणि राजनील फिल्म प्रोडक्शन निर्मित या चित्रपटाने मोठ्या पडद्यावर आपली ठसठशीत छाप उमटवली आहे.ग्रामीण राजकारणाचं भयावह वास्तव, सत्तेचा खेळ आणि मानवी स्वभावातील बदल अत्यंत प्रभावीपणे मांडणारा ‘सुड शकारंभ’ प्रदर्शित होताच चर्चेचा विषय ठरला आहे. संपूर्ण महाराष्ट्रातील चित्रपटगृहांमध्ये हा सिनेमा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत असून, सिनेरसिकांकडून सकारात्मक आणि भारावून टाकणाऱ्या प्रतिक्रिया मिळत आहेत.प्रेक्षकांच्या मते, “या चित्रपटाची संकल्पना वेगळी असून आजच्या सामाजिक वास्तवाशी भिडणारी आहे. सुरुवातीपासून शेवटपर्यंत रहस्य आणि थरार कायम राहतो. कथेची पकड कुठेही सैल होत नाही आणि शेवट इतका धक्कादायक आहे की तो अक्षरशः हादरवून सोडतो. ‘सुड शकारंभ’ हा अनुभव थिएटरमध्येच घ्यायला हवा.”चित्रपटाच्या विशेष स्क्रीनिंगदरम्यान कलाकार आणि संपूर्ण टीम प्रेक्षकांच्या भेटीस आली होती. यावेळी त्यांनी चित्रपटामागील प्रवास, संघर्ष आणि अनुभव प्रेक्षकांसोबत शेअर केले. मिळणारा भरभरून प्रतिसाद पाहून संपूर्ण टीम भावूक झाली होती. महाराष्ट्रातील विविध भागांतील कलाकारांना एकत्र आणून असा प्रभावी सिनेअनुभव घडवता आल्याचा विशेष आनंद त्यांनी व्यक्त केला.या चित्रपटात मनीषा मोरे, आयुष उलघडे, ओम पानस्कर, सुनील सूर्यवंशी, ऐश्वर्या मल्लिकार्जुन, सोनाली घाडगे, सलोनी लोखंडे, राज साने आणि मारुती केंगार यांनी आपल्या दमदार अभिनयातून प्रत्येक पात्राला स्वतंत्र ओळख दिली आहे. विकी वाघ यांचे संगीत आणि पार्श्वसंगीत कथेला अधिक तीव्र बनवते. मनीष राजगिरे, हर्षवर्धन वावरे, विकी वाघ आणि मयुरी जाधव यांच्या आवाजामुळे गाण्यांना भावनिक खोली मिळाली असून, पॅनोरमा म्युझिकअंतर्गत हे संगीत प्रेक्षकांपर्यंत पोहोचत आहे.शोएब खतीब यांच्या लेखन-दिग्दर्शनातून साकारलेला ‘सुड शकारंभ’ हा वास्तव, तीव्रता आणि सिनेमॅटिक भव्यतेचा प्रभावी संगम ठरतो. ज्योती पाटील यांची प्रस्तुती आणि राजनील फिल्म प्रोडक्शनची निर्मिती याला श्रीराज पाटील व दत्तसंग्राम वासमकर यांची भक्कम साथ लाभली आहे.रोहण पिंगळ आणि अमेय तानवडे यांच्या कॅमेऱ्यातून ग्रामीण सत्तासंघर्ष जिवंत उभा राहतो, तर रोहित रुकडे यांच्या संकलनामुळे कथेला धार येते. सोनाली घाडगे यांचे कला दिग्दर्शन आणि संपूर्ण प्रॉडक्शन टीमचे योगदान चित्रपटाला अधिक बळकटी देते.सत्तेचा खेळ, सूडाची ज्वाला आणि बदलत्या माणसाची कहाणी सांगणारा ‘सुड शकारंभ’ सध्या आपल्या जवळच्या सिनेमागृहात प्रदर्शित असून, हा सिनेअनुभव मोठ्या पडद्यावरच पाहावा, असाच सूर प्रेक्षकांमध्ये आहे.