
पुणे : राज्य सरकारच्या मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेसाठी अनुसूचित जातींसाठी राखीव असलेला सुमारे ३९३ कोटी रुपयांचा निधी वर्ग करण्याचा निर्णय अन्यायकारक आणि बेकायदेशीर असल्याचा आरोप रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टीचे नेते राहुल डंबाळे यांनी केला आहे. सरकारने हा निर्णय तात्काळ मागे घ्यावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.सामाजिक न्याय विभागाने दि. २० जानेवारी रोजी काढलेल्या शासन निर्णयानुसार अनुसूचित जातींसाठी राखीव असलेला तब्बल ३९३.२५ कोटी रुपयांचा निधी मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेसाठी वर्ग करण्यात आला आहे. अनुसूचित जातींसाठीचा निधी अशा प्रकारे इतर योजनांसाठी वापरणे कायद्याने निषिद्ध असल्याचे डंबाळे यांनी स्पष्ट केले.एकीकडे अनुसूचित जातींसाठी असलेल्या शिष्यवृत्ती, घरकूल, शिक्षण आणि रोजगाराशी संबंधित योजनांचा निधी कमी केला जात असताना, दुसरीकडे या समाजासाठी राखीव निधी दुसऱ्या योजनेसाठी वळवणे म्हणजे सरळ सरळ अन्याय असल्याचे त्यांनी सांगितले.या प्रकरणी रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टीने राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच केंद्रीय व राज्य अनुसूचित जाती आयोगाकडे तक्रार दाखल केली असून, या निर्णयाची चौकशी करून जबाबदारांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. अनुसूचित जातींच्या हक्कांवर गदा आणणाऱ्या कोणत्याही निर्णयाविरोधात संघर्ष सुरूच राहील, असा इशाराही राहुल डंबाळे यांनी दिला आहे.