
पुणे : २४ व्या पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा (पिफ) समारोप गुरुवार, दि. २२ जानेवारी २०२६ रोजी सायंकाळी ५ वाजता बालगंधर्व रंगमंदिर येथे भव्य समारंभात होणार आहे. या समारोप समारंभास राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार प्रमुख उपस्थित राहणार आहेत.समारोप समारंभात भारतीय चित्रपटसृष्टीतील उल्लेखनीय योगदानाबद्दल ज्येष्ठ अभिनेते बिस्वजित चॅटर्जी, ज्येष्ठ अभिनेत्री फरीदा जलाल आणि आशा काळे यांना ‘पीफ डिस्टिंग्विश्ड अवॉर्ड’ प्रदान करण्यात येणार आहे. तसेच ज्येष्ठ व्हायोलिन वादक व संगीतकार अमर हलदीपूर यांना संगीत क्षेत्रातील योगदानासाठी ‘संगीतकार एस. डी. बर्मन आंतरराष्ट्रीय पुरस्कार’ देऊन गौरविण्यात येणार आहे, अशी माहिती पिफचे अध्यक्ष व संचालक डॉ. जब्बार पटेल यांनी दिली.याचवेळी स्पर्धात्मक विभागातील पुरस्कारांचे वितरण होणार असून, सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय चित्रपटास ‘महाराष्ट्र शासन संत तुकाराम सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय चित्रपट पुरस्कार’ (१० लाख रुपये) तर सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपटास महाराष्ट्र शासनाचा संत तुकाराम उत्कृष्ट आंतरराष्ट्रीय मराठी चित्रपट पुरस्कार (५ लाख रुपये) प्रदान करण्यात येणार आहे.पुणे फिल्म फाउंडेशन, सांस्कृतिक कार्य विभाग, महाराष्ट्र शासन आणि दादासाहेब फाळके चित्रनगरी, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित हा महोत्सव १५ ते २२ जानेवारी २०२६ या कालावधीत पुण्यातील १० स्क्रीनवर मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.समारोप समारंभास विविध देशांचे कॉन्सूल जनरल, आंतरराष्ट्रीय ज्युरी सदस्य, महोत्सवात सहभागी झालेले दिग्दर्शक, कलाकार आणि मान्यवर उपस्थित राहणार आहेत