सध्याच्या चित्रपटातून साहित्य हरवत चालले आहे – तमिळ लेखक बी. जेयामोहन यांची खंत

पुणे, दि.22 :सध्याच्या चित्रपटसृष्टीत साहित्याचा प्रभाव कमी होत चालला असून त्यामुळे एकसारख्या आशयाचे चित्रपट पुन्हा पुन्हा निर्माण होत आहेत. यातून नावीन्य हरवत असल्याची खंत तमिळ लेखक व पटकथालेखक बी. जेयामोहन यांनी व्यक्त केली.पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात आयोजित विजय तेंडुलकर स्मृती व्याख्यानात ‘कादंबरी ते चित्रपट’ या विषयावर ते बोलत होते. ज्येष्ठ नाटककार सतीश आळेकर यांनी त्यांचा परिचय करून दिला.जेयामोहन म्हणाले, “आजचे अनेक चित्रपट हे इतर चित्रपटांवर आधारित असतात. साहित्याचा मूळ गाभा त्यातून हरवलेला आहे. परिणामी पाच-सहा ठराविक आशयसूत्रेच वारंवार दिसतात. काही चित्रपटांमध्ये ही सर्व आशयसूत्रे एकाच वेळी वापरलेली दिसतात.”ते पुढे म्हणाले, “कादंबरीतून थेट कथानक किंवा संवाद उचलण्याऐवजी पटकथालेखकाने स्वतःचे कथा-सूत्र विकसित करावे. चित्रपटात संवादांपेक्षा दृश्यांना अधिक महत्त्व असते. कादंबरीतील तत्त्वज्ञानात्मक चर्चा चित्रपटात तशीच आणू नये. प्रभावी दृश्यरचना आणि मुख्य पात्रांभोवतीचे नाट्य यावर पटकथा उभारली पाहिजे.”कादंबरीच्या प्रकारांविषयी बोलताना जेयामोहन यांनी स्पष्ट केले की, कादंबऱ्या मुख्यत्वे कलात्मक आणि व्यावसायिक अशा दोन प्रकारात विभागल्या जातात. कलात्मक कादंबऱ्यांमध्ये अभिजात, आधुनिकतावादी आणि आकृतीबंद नसलेल्या कादंबऱ्यांचा समावेश होतो. अभिजात कादंबऱ्या तत्त्वज्ञान आणि संस्कृतीचे सखोल चित्रण करतात, तर आधुनिकतावादी कादंबऱ्या व्यक्तिकेंद्रित संघर्ष मांडतात, ज्या चित्रपटांसाठी अधिक उपयुक्त ठरतात.“तद्दन व्यावसायिक कादंबऱ्या साहित्यदृष्ट्या अपूर्ण असू शकतात; मात्र सक्षम दिग्दर्शकाच्या हातात त्या प्रभावी चित्रपटात रूपांतरित होऊ शकतात,” असे मत त्यांनी व्यक्त केले.आपल्या सर्जनशील प्रवासाविषयी बोलताना ते म्हणाले, “मी दोन वर्षे भिकारी म्हणून देशभर फिरलो. त्या अनुभवातून ‘येळम उलगम’ ही कादंबरी आणि ‘नान कडाउल’ हा चित्रपट निर्माण झाला. ‘द अबीस’ या नावाने ही कादंबरी आता इंग्रजीत येत आहे. ‘कादल’ चित्रपटासाठी मी ७०० पानांची कादंबरी लिहिली होती, जी चित्रपट म्हणून चालली नाही; मात्र १५ वर्षांनंतर ती कादंबरी स्वरूपात प्रकाशित होत आहे.”यावेळी सतीश आळेकर यांनी विजय तेंडुलकर यांच्या साहित्यिक योगदानावर प्रकाश टाकत समकालीन सिने-नाट्य आणि साहित्य क्षेत्रातील त्यांचे महत्त्व अधोरेखित केले. तसेच, बी. जेयामोहन यांनी तमिळ भाषेत २६ भागांमध्ये २२,६०० पानांचे महाभारत लेखन केल्याचा उल्लेख करत ते जनमानसावर प्रभाव टाकणारे विचारवंत असल्याचे त्यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Call Now Button