बजाज पुणे ग्रँड टूर २०२६ साठी युसीआय मानकांनुसार अत्याधुनिक वैद्यकीय सज्जता

पुणे, दि. 22 :बजाज पुणे ग्रँड टूर २०२६ या आंतरराष्ट्रीय सायकलिंग स्पर्धेदरम्यान सायकलपटूंच्या आरोग्य व सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देत आंतरराष्ट्रीय सायकलिंग संघटना (UCI) च्या मानकांनुसार अत्याधुनिक वैद्यकीय सुविधा उभारण्यात आल्या आहेत. कोणत्याही आकस्मिक परिस्थितीत त्वरित वैद्यकीय मदत उपलब्ध व्हावी, यासाठी व्यापक व काटेकोर नियोजन करण्यात आले आहे.स्पर्धा मार्गावर प्रत्येक ८ किमी अंतरावर सुसज्ज वैद्यकीय पथक, रुग्णवाहिका, प्रथमोपचार संच आणि आपत्कालीन वैद्यकीय तंत्रज्ञ (EMT) तैनात आहेत. तसेच प्रत्येक २५ ते ३० किमीवर डॉक्टर व आवश्यक उपकरणांसह प्रगत जीवनरक्षक सेवा (ALS) युक्त मोबाईल आयसीयू युनिट कार्यरत ठेवण्यात आले आहे. प्रत्येक मार्गाच्या सुरुवात व समाप्ती ठिकाणी स्वतंत्र मेडिकल बेस कॅम्प उभारण्यात आले आहेत.डोंगराळ, घाट व घनदाट क्षेत्रात सुरक्षिततेच्या दृष्टीने प्रत्येक ५ किमीवर अतिरिक्त वैद्यकीय पथके, वळण, चढाव, पूल व गर्दीच्या ठिकाणी पर्यायी व्यवस्था करण्यात आली आहे. नदी व ओढ्यांच्या मार्गांवर ‘आपदा मित्रां’ची नियुक्ती करण्यात आली असून, २०-२५ किमी त्रिज्येतील शासकीय व खासगी रुग्णालयांशी सतत समन्वय साधण्यात येत आहे.१०८ रुग्णवाहिका सेवा व खासगी रुग्णवाहिकांचा समन्वय ठेवत प्रत्येक मार्गावर किमान दोन रुग्णवाहिका तैनात आहेत. सर्व रुग्णवाहिकांमध्ये जीपीएस, वॉकी-टॉकी व ट्रॅकिंग सिस्टीम उपलब्ध असून, १०८ नियंत्रण कक्षाशी थेट संपर्क ठेवण्यात आला आहे. आरोग्य सेवा २४x७ सज्ज असून आपत्कालीन वैद्यकीय प्रतिसाद (EMR) नियंत्रण कक्षातून संपूर्ण यंत्रणा नियंत्रित केली जात आहे.आयसीयू, ट्रॉमा केअर व क्रीडा दुखापत उपचार सुविधा असलेल्या रुग्णालयांना स्तर-१ आपत्कालीन रुग्णालये, तर इतर रुग्णालयांना स्तर-२ सहाय्यक उपचार केंद्र म्हणून नामनिर्देशित करण्यात आले आहे. संभाव्य आपत्कालीन परिस्थितीसाठी रुग्णालयांमध्ये पूर्वसूचना कक्ष व स्पर्धाकालीन रुग्णांसाठी राखीव प्रवेश व्यवस्था करण्यात आली आहे.युसीआय मानकांनुसार औषधे, ट्रॉमा किट, प्रथमोपचार पेट्या, सीपीआर मास्क, स्ट्रेचर, बँडेज, बर्न ड्रेसिंग, आय वॉश, स्प्लिंट्स, आपत्कालीन ब्लँकेट, वैयक्तिक संरक्षण साहित्य तसेच आवश्यक औषधांचा समावेश करण्यात आला आहे. लाईव्ह डॅशबोर्ड, मोबाइल अ‍ॅप व रेडिओ ट्रॅकिंग सिस्टीमद्वारे सर्व वैद्यकीय पथके, रुग्णवाहिका व रुग्णालयांमधील समन्वय साधला जात आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Call Now Button