प्रशासकीय उदासीनतेचा कडेलोट : खराडीतील शेतकरी कुटुंबाचा भूमाफियांविरोधात आमरण उपोषणाचा इशारा

पुणे :खराडी येथील वडिलोपार्जित जमिनीच्या कथित फसवणूकप्रकरणी अनेक वर्षांपासून न्यायासाठी प्रशासनाचे उंबरठे झिजवूनही कोणतीही ठोस कारवाई न झाल्याने पीडित शेतकरी शेख कुटुंब अखेर टोकाच्या संघर्षाच्या मार्गावर उतरले आहे. प्रशासनाच्या दिरंगाईला आणि भूमाफियांच्या त्रासाला कंटाळून शेख कुटुंबाने येत्या २२ जानेवारी २०२६ पासून पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सहकुटुंब आमरण उपोषण करण्याचा इशारा दिला आहे.श्रमिक पत्रकार भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत शेतकरी आरीफ कासम बेग, राजाभाऊ चौधरी, सामाजिक कार्यकर्त्या प्रभा करपे, हसिना शेख, वकील ताहीर खान फिरोज बेग आणि आसिफ शेख यांनी हा गंभीर प्रकार उघडकीस आणला.खराडी (ता. हवेली) येथील सर्व्हे नं. २२/२ मधील सुमारे ४ हेक्टर १० आर वडिलोपार्जित जमीन पैकी १२५.५ आर आणि २४ आर जमीन सन २००६ मध्ये गोयल गंगा डेव्हलपर्सला केवळ विकासासाठी आणि १८ महिन्यांच्या अटीवर देण्यात आली होती. मात्र, जयप्रकाश गोयल, अतुल गोयल आणि अमित गोयल यांनी संगनमताने आमची फसवणूक केल्याचा गंभीर आरोप अर्जदार हसिना अन्वर शेख यांनी केला.या जमिनीवर न्यायालयाचा आदेश असतानाही बेकायदेशीरपणे सदनिका विक्री करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. याविरोधात आवाज उठवल्यानंतर ३ मे २०२१ रोजी २०० ते ४०० गुंडांच्या जमावाने बेग व शेख कुटुंबावर प्राणघातक हल्ला केल्याचे तक्रारीत नमूद आहे. कोरोना काळात जमावबंदी लागू असतानाही हा हल्ला झाला, मात्र पोलिसांनी कोणतीही ठोस कारवाई केली नसल्याचा दावा कुटुंबाने केला. या संदर्भातील व्हिडिओ पुरावे पत्रकार परिषदेत दाखवण्यात आले.चंदननगर व खराडी पोलीस स्टेशन, पुणे महानगरपालिका तसेच दुय्यम निबंधक कार्यालयाकडे वारंवार तक्रारी करूनही अधिकारी दोषींनाच पाठीशी घालत असल्याचा आरोप कुटुंबाने केला आहे. न्याय न मिळाल्यास बेमुदत साखळी उपोषण व आमरण उपोषण करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे. या काळात कुटुंबाला काहीही दगाफटका झाल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी प्रशासन आणि संबंधित भूमाफियांवर राहील, असा इशाराही देण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Call Now Button