‘रणपति शिवराय स्वारी आग्रा’ ट्रेलरचे भव्य अनावरण; AI चॅटबॉटद्वारे इतिहासाशी थेट संवादाचा अनोखा उपक्रम

छत्रपती शिवाजी महाराजांचे धैर्य, अद्वितीय रणनीती, तल्लख बुद्धिमत्ता आणि अष्टावधानी नेतृत्व यांचे प्रभावी दर्शन घडवणाऱ्या ‘रणपति शिवराय स्वारी आग्रा’ या भव्य मराठी चित्रपटाचा ट्रेलर अनावरण सोहळा मोठ्या दिमाखात पार पडला. शिववंदना आणि शिवशाहिरांच्या दमदार पोवाड्यांनी हा सोहळा अधिकच भारावून टाकला. ट्रेलरला प्रेक्षकांकडून प्रचंड प्रतिसाद मिळत असून, शिवरायांच्या आग्रा भेटीतील शौर्य आणि धाडसाची झलक प्रभावीपणे मांडण्यात आली आहे.

औरंगजेबासारख्या कपटी आणि बलाढ्य शत्रूच्या दरबारात, कडेकोट पहाऱ्यात शिवाजी महाराजांनी दाखवलेले धैर्य, दूरदृष्टी आणि माणसांची अचूक पारख या ट्रेलरमधून ठळकपणे समोर येते. ही आग्रा स्वारी केवळ ऐतिहासिक घटना नसून महाराजांच्या नेतृत्वगुणांचे सर्वोच्च उदाहरण असल्याचे चित्रपटातून अधोरेखित करण्यात आले आहे.

मराठी चित्रपटसृष्टीच्या बदलत्या मार्केटिंग संकल्पनांचा प्रत्यय देत, या ट्रेलर अनावरण सोहळ्यात एक अभिनव उपक्रम सादर करण्यात आला. इतिहासातील व्यक्तिमत्त्वांशी संवाद साधता यावा, यासाठी AI आधारित चॅटबॉट सादर करण्यात आला आहे. यावेळी महाराजांचा ‘तिसरा डोळा’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बहिर्जी नाईक यांच्या व्यक्तिरेखेवर आधारित चॅटबॉटचे अनावरण करण्यात आले. हा चॅटबॉट विविध भाषांमध्ये काही सेकंदांत युजर्सच्या प्रश्नांना उत्तरे देणार असून, शिवप्रेमींसाठी हा उपक्रम विशेष आकर्षण ठरत आहे.

चित्रपटाचे लेखन-दिग्दर्शन दिग्पाल लांजेकर यांनी केले असून, पॅनोरमा स्टुडिओज आणि मुगाफी यांच्या संयुक्त विद्यमाने हा चित्रपट तयार करण्यात आला आहे. लेखक-दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांनी सांगितले की, “शिवरायांच्या अष्टावधानी नेतृत्वाची, शौर्याची आणि शिस्तबद्ध आखणीची अनुभूती हा चित्रपट नव्या पिढीला देईल.” निर्मात्यांनीही हा चित्रपट प्रेक्षकांना चित्रपटगृहांकडे आकर्षित करण्यात यशस्वी ठरेल, असा विश्वास व्यक्त केला.

मृणाल कुलकर्णी, अभिजीत श्वेतचंद्र, समीर धर्माधिकारी, अजय पूरकर, स्मिता शेवाळे, पुनीत इस्सार यांच्यासह अनेक दिग्गज कलाकार या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिका साकारत आहेत. ‘रणपति शिवराय स्वारी आग्रा’ हा चित्रपट ३० जानेवारी रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. पॅनोरमा स्टुडिओज या चित्रपटाचे वर्ल्डवाईड वितरण करणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Call Now Button