
लोणावळा :
सिंहगड कॉलेज, लोणावळा येथील कर्मचारी व कामगार गेल्या दीर्घ काळापासून गंभीर आर्थिक संकटात सापडले असून, त्यांच्या न्याय्य व कायदेशीर मागण्यांकडे कॉलेज व्यवस्थापनाकडून सातत्याने दुर्लक्ष होत आहे. या अन्यायाविरोधात न्याय मिळविण्यासाठी सर्व कर्मचारी व कामगारांनी दि. १९ जानेवारीपासून बेमुदत संप पुकारला आहे, अशी माहिती भारतीय मजदूर संघाचे चिटणीस बाळासाहेब भुजबळ यांनी दिली.
कॉलेजमधील अनेक कर्मचाऱ्यांचे व कामगारांचे सलग १४ महिन्यांचे वेतन अद्याप अदा करण्यात आलेले नाही. त्यामुळे त्यांच्या कुटुंबांवर उपासमारीची वेळ आली असून शिक्षण, आरोग्य व दैनंदिन खर्च भागविणे अशक्य झाले आहे. तसेच भविष्य निर्वाह निधी (पीएफ) सन २०२५ पर्यंत थकीत असून, ही गंभीर कायदेशीर बाब असतानाही व्यवस्थापनाकडून कोणतीही ठोस कार्यवाही होत नाही, असा आरोप करण्यात आला आहे.
या संदर्भात सहायक कामगार आयुक्त श्री. गजानन शिंदे यांनी त्रिपक्षीय बैठक आयोजित केली होती; मात्र या बैठकीस कॉलेज व्यवस्थापनाचा कोणीही प्रतिनिधी उपस्थित राहिला नाही. तसेच लोणावळा ग्रामीण पोलीस निरीक्षक श्री. तायडे यांच्यासोबत पोलीस ठाण्यात झालेल्या बैठकीस व्यवस्थापनाकडून संचालक गायकवाड उपस्थित होते. या बैठकीदरम्यान सिंहगड टेक्निकलचे चेअरमन एम. एन. नवले यांच्यासोबत बैठक आयोजित करण्याचे आश्वासन देण्यात आले होते; मात्र अद्याप कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नाही.
याशिवाय कामगार व कर्मचाऱ्यांच्या अनंत बँकेत असलेल्या ठेवी अद्याप परत मिळालेल्या नाहीत, त्यामुळे अनेक कुटुंबांचे आयुष्य पूर्णतः विस्कळीत झाले आहे. वारंवार निवेदने, पत्रव्यवहार व पाठपुरावा करूनही प्रशासन व व्यवस्थापनाकडून केवळ आश्वासने दिली जात असून प्रत्यक्षात कोणताही दिलासा मिळालेला नाही, असा आरोप संघटनेने केला आहे.
भारतीय मजदूर संघटनेच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे की,
थकीत १४ महिन्यांचे संपूर्ण वेतन तात्काळ अदा करण्यात यावे,
पीएफची थकीत रक्कम त्वरित जमा करण्यात यावी,
तसेच अनंत बँकेतील कामगारांच्या ठेवी परत मिळवून द्याव्यात.
या मागण्या त्वरित मान्य न झाल्यास येत्या काळात तीव्र आंदोलन, धरणे, निदर्शने तसेच कायदेशीर लढा उभारण्यात येईल. या संघर्षाची संपूर्ण जबाबदारी कॉलेज व्यवस्थापन व संबंधित प्रशासनाची राहील, असा ठाम इशाराही देण्यात आला आहे.
कामगारांच्या न्याय्य हक्कांसाठी हा संघर्ष शेवटपर्यंत सुरू राहील, असे भारतीय मजदूर संघाचे चिटणीस बाळासाहेब भुजबळ यांच्यासह कामगार प्रतिनिधी सुजीत मिसाळ, दत्ता गाडे, शुभम फाळके, अतुल बोरकर, नितीन गुंड आणि सुरेखा कदम यांनी ठामपणे जाहीर केले आहे.