मराठी माध्यम शाळांना नवं बळ देणारा ‘क्रांतिज्योती विद्यालय’ बॉक्स ऑफिसवरही ठरतोय क्रांतिकारक!

मराठी चित्रपटसृष्टीत क्वचितच असा एखादा चित्रपट येतो, जो केवळ मनोरंजनापुरता मर्यादित राहत नाही, तर समाजमनाला स्पर्श करत एक सकारात्मक चळवळ उभी करतो. ‘क्रांतिज्योती विद्यालय – मराठी माध्यम’ हा चित्रपट सध्या नेमकं तेच करत असून, मराठी शाळा, शिक्षक आणि विद्यार्थ्यांना नवसंजीवनी देण्याचं काम करत आहे.

६.५० कोटी रुपयांच्या निर्मिती खर्चात तयार झालेल्या या चित्रपटाने अवघ्या काही दिवसांत २० कोटी रुपयांचा टप्पा ओलांडत बॉक्स ऑफिसवर घवघवीत यश मिळवलं आहे. हे यश केवळ आर्थिक नसून, भावनिक आणि सामाजिक स्तरावरही महत्त्वाचं मानलं जात आहे.

चित्रपट प्रदर्शित झाल्यापासून प्रेक्षकांनी त्याला भरभरून प्रतिसाद दिला आहे. कथेमधील प्रामाणिकपणा, शिक्षक-विद्यार्थ्यांमधील जिव्हाळ्याचं नातं आणि मराठी माध्यम शाळेचा आत्मसन्मान यामुळे हा चित्रपट प्रेक्षकांच्या मनाला थेट भिडतो. राज्यभरातील अनेक मराठी माध्यम शाळांनी आणि शिक्षकांनी पुढाकार घेत सामूहिक शोज आयोजित केले आहेत. काही ठिकाणी माजी विद्यार्थी आणि शिक्षक एकत्र येत रियुनिअनच्या निमित्ताने हा चित्रपट पाहताना दिसत आहेत.

या चित्रपटाने मराठी माध्यम शाळांविषयी असलेली न्यूनगंडाची भावना दूर करत “आपली शाळा, आपली भाषा आणि आपली ओळख” याचा अभिमान पुन्हा जागवला आहे. चित्रपट संपल्यानंतर थिएटरमध्ये होणारे टाळ्यांचे गजर, भारावलेले चेहरे आणि डोळ्यांत दिसणारा विश्वास, हा या चित्रपटाच्या प्रभावाचा ठळक पुरावा ठरत आहे.

प्रेक्षकांकडून मिळणाऱ्या सकारात्मक प्रतिसादाबद्दल दिग्दर्शक हेमंत ढोमे म्हणतात,

“मराठी शाळेची कथा प्रामाणिकपणे मांडायची, एवढीच आमची भूमिका होती. आज विद्यार्थी, शिक्षक आणि पालक या चित्रपटातून जे बळ घेत आहेत, त्यातून शिक्षण व्यवस्थेलाही याची जाणीव होईल, अशी मला आशा आहे. मराठी शाळा टिकाव्यात, फुलाव्यात आणि पुढच्या पिढ्यांपर्यंत जाव्यात, हीच या चित्रपटामागची खरी प्रेरणा आहे.”

‘क्रांतिज्योती विद्यालय – मराठी माध्यम’ या चित्रपटात सचिन खेडेकर, अमेय वाघ, सिद्धार्थ चांदेकर, क्षिती जोग, कादंबरी कदम, हरीश दुधाडे, निर्मिती सावंत, पुष्कराज चिरपुटकर आणि प्राजक्ता कोळी यांची दमदार भूमिका आहे. चलचित्र मंडळी निर्मित या चित्रपटाचे लेखन व दिग्दर्शन हेमंत ढोमे यांनी केले असून, क्षिती जोग या चित्रपटाच्या निर्माती आहेत. सहनिर्माते म्हणून विराज गवस, उर्फी काझमी (क्रेझी फ्यू फिल्म्स) आणि अजिंक्य ढमाळ यांचा सहभाग आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Call Now Button