
पुणे, दि. २१ : ‘बजाज पुणे ग्रँड टूर २०२६’ या आंतरराष्ट्रीय सायकल स्पर्धेदरम्यान सायकलपटूंच्या सुरक्षिततेसाठी बजाज ऑटो लिमिटेडकडून पुणे शहर व ग्रामीण पोलिस दलाला अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज अशा एकूण १०० ‘डोमिनार ४००’ मोटारसायकली देण्यात आल्या आहेत. यामध्ये पुणे व पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयासाठी प्रत्येकी २५, तर पुणे जिल्हा ग्रामीण पोलीस दलासाठी ५० मोटारसायकलींचा समावेश आहे.
४३७ किलोमीटर लांबीच्या या सायकल स्पर्धेच्या संपूर्ण मार्गावर या मोटारसायकली प्रथमच अधिकृत सुरक्षा ताफ्याचा भाग म्हणून कार्यरत आहेत. या बाइक्सद्वारे प्रभावी गस्त, वाहतूक नियंत्रण तसेच आपत्कालीन परिस्थितीत जलद प्रतिसाद देणे शक्य होत असून नागरिकांचेही विशेष लक्ष वेधले जात आहे.
पोलीस दलाच्या आव्हानात्मक गरजा लक्षात घेऊन ‘डोमिनार ४००’च्या मूळ आवृत्तीत महत्त्वपूर्ण सुधारणा करण्यात आल्या आहेत. या मोटारसायकलींमध्ये शक्तिशाली एलईडी आपत्कालीन दिवे, सायरन, पुश-टू-टॉक रेडिओ प्रणालीसह सार्वजनिक घोषणा यंत्रणा बसवण्यात आली आहे. तसेच जीपीएस ट्रॅकिंग सिस्टीम, मोबाईल फोन व वॉकी-टॉकीसाठी चार्जिंग पॉइंट्स यांसारख्या सुविधा देण्यात आल्या आहेत.
प्रत्येक ‘डोमिनार ४००’ मध्ये आपत्कालीन प्रथमोपचार किटसह कुलूप लावता येणारे साइड पॅनियर्स आणि टॉप बॉक्स उपलब्ध असून त्यामध्ये वैद्यकीय साहित्य, फॉरेन्सिक साधने व आवश्यक कागदपत्रे सुरक्षितरीत्या वाहून नेता येतात.
३७३.३ सीसी क्षमतेच्या लिक्विड-कूल्ड इंजिनसह सज्ज असलेल्या या मोटारसायकलींमध्ये अँटी-लॉक ब्रेकिंग सिस्टीम (ABS), ट्रॅक्शन कंट्रोल आणि इलेक्ट्रॉनिक सस्पेंशन ॲडजस्टमेंट यांसारखी प्रगत रायडर सहाय्यक प्रणाली देण्यात आली असून उच्च वेगात पाठलाग, कठीण रस्ते व आपत्कालीन परिस्थितीत अधिक सुरक्षितता आणि नियंत्रण मिळते.