“…म्हणून भरत गीते यांच्यासारख्या मराठी उद्योजकांचा अभिमान”– दावोस येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे गौरवोद्गार

पुणे, दि. 21– दावोस (स्वित्झर्लंड) : जागतिक आर्थिक परिषदेत (वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम) गेल्या वर्षी करण्यात आलेल्या ५०० कोटी रुपयांच्या सामंजस्य कराराची अवघ्या एका वर्षात यशस्वी अंमलबजावणी करून प्रत्यक्ष उत्पादन सुरू करणाऱ्या ‘अ‍ॅल्युमिनियम मॅन ऑफ इंडिया’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या उद्योजक भरत गीते यांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विशेष कौतुक केले. “वर्षभरात उद्योग उभारणी करणाऱ्या गीते यांच्यासारख्या मराठी उद्योजकांचा मला अभिमान वाटतो,” असे गौरवोद्गार त्यांनी काढले.

दावोस येथे सुरू असलेल्या जागतिक आर्थिक परिषदेत देवेंद्र फडणवीस आणि भरत गीते यांच्यात झालेल्या संवादावेळी उद्योग उभारणीतील नियोजन, वेगवान अंमलबजावणी, प्रशासन आणि उद्योजकांमधील समन्वय तसेच उत्पादन क्षेत्राचे अर्थव्यवस्थेतील वाढते महत्त्व यावर सविस्तर चर्चा झाली. ‘आत्मनिर्भर भारत’, ‘मेक इन इंडिया’ आणि ‘व्होकल फॉर लोकल’ या केंद्र सरकारच्या उपक्रमांना बळ देणाऱ्या या प्रकल्पामुळे कमी कालावधीत उद्योग उभारणी शक्य असल्याचा प्रेरणादायी संदेश देशभरातील उद्योजकांना मिळाल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, अहिल्यानगर जिल्ह्यातील सुपा एमआयडीसी येथे उभारण्यात आलेल्या ‘तौरल इंडिया’च्या अत्याधुनिक अ‍ॅल्युमिनियम कास्टिंग्ज उत्पादन प्रकल्पाने अल्पावधीतच उत्पादन सुरू करून राज्यासमोर आदर्श औद्योगिक मॉडेल उभे केले आहे. या प्रकल्पामुळे परिसरातील स्थानिक तरुणांना मोठ्या प्रमाणावर रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या असून, स्थानिक औद्योगिक विकासाला चालना मिळाली आहे.

“सामंजस्य करार केवळ कागदापुरता न राहता एका वर्षात प्रत्यक्ष उत्पादनात रूपांतरित होऊ शकतो, याचे भरत गीते आणि तौरल इंडिया हे उत्तम उदाहरण आहे. मराठी उद्योजकांमध्ये जागतिक स्तरावर स्पर्धा करण्याची क्षमता आहे. योग्य धोरणात्मक पाठबळ दिल्यास महाराष्ट्र उद्योग क्षेत्रात नवे शिखर गाठेल,” असा विश्वासही मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केला.

यावेळी उद्योजक भरत गीते म्हणाले की, तौरल इंडियाने २०१६ पासून औद्योगिक विस्तार करत ऊर्जा क्षेत्र, संरक्षण उत्पादन, आरोग्य उपकरणे तसेच एरोस्पेस क्षेत्रासाठी आवश्यक अचूक अ‍ॅल्युमिनियम कास्टिंग्ज निर्मितीत महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. उत्पादन क्षेत्र हे मजबूत अर्थव्यवस्थेचा कणा असून वाहन उद्योग, अभियांत्रिकी, पायाभूत सुविधा, इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रिक मोबिलिटी, संरक्षणपूरक उद्योग, कृषी प्रक्रिया आणि उच्च-मूल्य निर्यातक्षम उत्पादन क्षेत्र बळकट झाल्यास राज्याचा औद्योगिक पाया अधिक मजबूत होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Call Now Button