
पुणे : १३५ वर्षांचा ऐतिहासिक वारसा लाभलेली महात्मा फुले मंडई ही पुण्याचा मानबिंदू असून, येथील व्यापारी व नागरिकांना भेडसावणाऱ्या मूलभूत समस्यांचे निराकरण प्राधान्याने करण्यात येणार असल्याचे आश्वासन प्रभाग क्रमांक २५ चे नवनिर्वाचित नगरसेवक मा. राघवेंद्र बाप्पू मानकर यांनी दिले.महात्मा फुले मंडई येथील व्यापाऱ्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी सायंकाळी आयोजित करण्यात आलेल्या आढावा दौऱ्यात ते बोलत होते. यावेळी व्यापाऱ्यांनी मंडईतील जुने झालेले विद्युत दिवे, अपुरी प्रकाशव्यवस्था तसेच स्वच्छतेच्या समस्यांबाबत गाऱ्हाणी मांडली.व्यापाऱ्यांनी सांगितले की, अपुऱ्या प्रकाशव्यवस्थेमुळे व्यापारी आणि खरेदीसाठी येणाऱ्या नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. तसेच नियमित स्वच्छतेअभावी मंडई परिसरात अस्वच्छता वाढत असल्याची तक्रारही करण्यात आली.यावर प्रतिक्रिया देताना मा. राघवेंद्र बाप्पू मानकर म्हणाले, “व्यापारी व नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने प्रकाशव्यवस्थेचा प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे. त्यामुळे महात्मा फुले मंडईतील विद्युत दिव्यांच्या समस्या येत्या दोन दिवसांत पूर्णतः सोडवण्यात येतील. तसेच स्वच्छतेसाठी प्रशासनासोबत समन्वय साधून प्रभावी यंत्रणा कार्यान्वित करण्यात येईल आणि कचरा साचणार नाही याची दक्षता घेतली जाईल.”ऐतिहासिक महात्मा फुले मंडईच्या संवर्धनासह व्यापाऱ्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी सातत्याने पाठपुरावा केला जाईल, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.