
पुणे, दि. २० जानेवारी २०२६ :प्रत्येक चित्रपट हा कलाकारासाठी शिकण्याचा नवा प्रवास असतो. मी आजवर अनेक दिग्दर्शकांसोबत काम केले, त्यांच्याकडून खूप काही शिकले; मात्र प्रत्येक चित्रपट माझ्यासाठी नवीन अनुभव घेऊनच येतो, असे प्रतिपादन ज्येष्ठ अभिनेत्री सीमा बिस्वास यांनी केले. त्या २४ व्या पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (पिफ) ‘मर्डर्स टू क्लोज अँड लव्ह टू फार’ या चित्रपटाच्या स्क्रीनिंगनंतर आयोजित संवाद सत्रात बोलत होत्या.मंजू बोरा आणि इस्रायलचे दिग्दर्शक डॅन वॉलमन यांनी संयुक्तपणे दिग्दर्शित केलेल्या या चित्रपटाबाबत सीमा बिस्वास म्हणाल्या, “कथा साधी असली तरी ती अतिशय अर्थपूर्ण आणि विचारप्रवर्तक आहे. संवेदनशील विषय असतानाही चित्रपटाची मांडणी भपकेबाज न करता साधेपणाने करण्यात आली आहे.”दरम्यान, निलेश नाईक दिग्दर्शित आणि विदुला नाईक निर्मित ‘द्विधा’ हा मराठी चित्रपटही पिफमध्ये प्रदर्शित झाला. वडील–मुलीच्या नात्यावर आधारित हा सिनेमा परदेशात स्थायिक झालेली पिढी आणि भारतातील पालक यांच्यातील भावनिक दुरावा अधोरेखित करतो. दीर्घकाळानंतर अभिनेता सतीश पुळेकर यांनी या चित्रपटातून सिनेमात पुनरागमन केले आहे.दिग्दर्शक निलेश नाईक म्हणाले, “आई-वडिलांना विसरू नका. लहानपणी त्यांनी आपल्यासाठी जे काही केले, त्याचप्रमाणे त्यांच्या वृद्धत्वात मानसिक आधार देणे हे आपले कर्तव्य आहे.” अभिनेत्री मानसी कुलकर्णी यांनी विद्यार्थी दशेत पाहिलेल्या महोत्सवात आपला चित्रपट प्रदर्शित होणे हा आनंदाचा क्षण असल्याचे सांगितले.मेघालयातील खासी हिल्स परिसरात घडणाऱ्या घटनांवर आधारित दिग्दर्शक प्रदीप कुब्राह यांचा ‘एलिसियन फील्ड’ हा चित्रपटही महोत्सवात दाखवण्यात आला. मृत्यूनंतर उरलेल्या व्यक्तींच्या भावना, वेदना आणि त्यांच्या आयुष्यावर होणारे परिणाम यांचा संवेदनशील वेध या चित्रपटात घेण्यात आला आहे. सूक्ष्म तपशील आणि प्रभावी अभिनयातून कथा बोलकी करण्याचा प्रयत्न केल्याचे कुब्राह यांनी नमूद केले.लेबनॉनमधील संघर्षाच्या पार्श्वभूमीवर प्रेम आणि संघर्षाचे नाते उलगडणारा सायरिल अरिस दिग्दर्शित ‘अ सॅड अँड ब्युटीफुल वर्ल्ड’ हा चित्रपटही प्रेक्षकांच्या भेटीस आला. यावेळी मुख्य अभिनेता हसन अकिल उपस्थित होते. “भारत माझा आवडता देश आहे. पुणे चित्रपट महोत्सवात येणे ही माझ्यासाठी खास संधी आहे,” असे त्यांनी सांगितले.याशिवाय, ज्येष्ठ अभिनेता किशोर कदम यांनी सिनेमा म्हणजे संपूर्ण टीमच्या मनात तयार होणारी एकसंध कल्पना असल्याचे मत मांडले. संतोष डावखर दिग्दर्शित ‘गोंधळ’ या चित्रपटातील त्यांच्या भूमिकेबाबत ते म्हणाले की, गोंधळ परंपरेचा सन्मान जपण्याचे काम हा सिनेमा करतो. श्रद्धा, सत्ता आणि परंपरेतील संघर्ष या चित्रपटातून प्रभावीपणे समोर येतो.