ज्युपिटर हॉस्पिटल, पुणे येथे गिया–बारे सिंड्रोमसाठी विशेष तात्काळ उपचार क्लिनिकची सुरुवात

पुणे, दि. 21 : पुण्यातील न्यूरोलॉजिकल आरोग्यसेवा अधिक सक्षम आणि जागतिक दर्जावर नेण्याच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल उचलत, ज्युपिटर हॉस्पिटल, बाणेर, पुणे येथे गिया–बारे सिंड्रोम (GBS) रुग्णांसाठी समर्पित व अत्याधुनिक GBS तात्काळ उपचार क्लिनिक सुरू करण्यात आले आहे. या विशेष क्लिनिकच्या माध्यमातून GBS रुग्णांचे अचूक व त्वरित निदान करून अवघ्या ६ ते ८ तासांच्या आत उपचार सुरू करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.गिया–बारे सिंड्रोम हा गंभीर न्यूरोलॉजिकल आजार असून वेळेवर उपचार न मिळाल्यास रुग्णाच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो. हे लक्षात घेऊन या क्लिनिकमध्ये प्रगत तपासण्या, आधुनिक निदान सुविधा, समर्पित आयसीयू, तसेच न्यूरोलॉजिस्ट, इंटेन्सिव्हिस्ट, फिजिओथेरपिस्ट, रिहॅबिलिटेशन तज्ज्ञ आणि प्रशिक्षित नर्सिंग टीमची २४ तास समन्वयित सेवा उपलब्ध असेल.यावेळी माध्यमांशी बोलताना न्यूरोलॉजी विभागाचे संचालक डॉ. राजस देशपांडे म्हणाले,“GBS हा असा आजार आहे ज्यामध्ये शरीराची प्रतिकारशक्ती चुकून नसांवर हल्ला करते. परिणामी अचानक अशक्तपणा, पक्षाघात, चालण्यात अडचण, तसेच श्वसनाच्या स्नायूंवर परिणाम होऊ शकतो. वेळेत उपचार सुरू झाल्यास रुग्ण पूर्णपणे बरा होण्याची शक्यता मोठ्या प्रमाणात वाढते.”ते पुढे म्हणाले की, सामान्यतः निदान व उपचार सुरू होईपर्यंत २४ ते ४८ तासांचा महत्त्वाचा कालावधी वाया जातो. मात्र या GBS क्लिनिकमध्ये ४ ते ६ तासांत सर्व तपासण्या पूर्ण करून उपचार सुरू करण्यासाठी विशेष प्रोटोकॉल तयार करण्यात आला आहे.GBS च्या उपचारांबाबत माहिती देताना त्यांनी सांगितले की,“IVIG (इम्युनोग्लोब्युलिन) किंवा प्लाझ्मा एक्स्चेंज या दोन प्रमुख उपचार पद्धती असून त्या खर्चिक असतात. मात्र या क्लिनिकमध्ये सर्वसामान्य रुग्णांसाठी विशेष सवलती उपलब्ध करून दिल्या जातील.”न्यूरोलॉजी कन्सल्टंट डॉ. शिवराज हुंगे म्हणाले,“GBS उपचार ही केवळ न्यूरोलॉजीपुरती मर्यादित प्रक्रिया नसून कार्डिओलॉजिस्ट, पल्मोनोलॉजिस्ट आणि इंटेन्सिव्हिस्ट यांचा समन्वय अत्यंत महत्त्वाचा असतो. तसेच व्हेंटिलेटरनंतर फिजिओथेरपी, स्पीच थेरपी आणि पुनर्वसनाच्या मदतीने रुग्ण पूर्णपणे पूर्ववत होऊ शकतो.”ज्युपिटर हॉस्पिटलचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र पाटणकर म्हणाले,“जलद निर्णय, अचूक समन्वय आणि ठराविक प्रोटोकॉलच्या आधारे त्वरित उपचार देणे हीच या समर्पित GBS क्लिनिकमागील भूमिका आहे. या उपक्रमातून अधिकाधिक रुग्णांचे प्राण वाचवण्याचा आमचा प्रयत्न आहे.”या GBS क्लिनिकमध्ये तात्काळ आयसीयू सेवा, प्रगत निदान, मल्टीडिसिप्लिनरी क्रिटिकल केअर आणि व्यापक पुनर्वसन सुविधा उपलब्ध असून, रुग्ण व त्यांच्या कुटुंबीयांमध्ये आजाराबाबत जागरूकता निर्माण करण्यावरही विशेष भर देण्यात येणार आहे. हा उपक्रम पुणे व महाराष्ट्रातील रुग्णांसाठी न्यूरोलॉजिकल उपचारांच्या क्षेत्रात एक महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Call Now Button