बजाज पुणे ग्रँड टूर २०२६ : पहिल्या टप्प्याला उत्साहात प्रारंभ; घाट-वळण रस्त्यांवर सायकलपटूंची कसोटी

पुणे, दि. २० : ‘बजाज पुणे ग्रँड टूर–२०२६’ या आंतरराष्ट्रीय सायकल स्पर्धेच्या पहिल्या टप्प्याची आज प्रचंड उत्साहात सुरुवात झाली. हिंजवडी येथील टी.सी.एस. सर्कल येथून सुरू झालेल्या या टप्प्याला विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे आणि ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्या उपस्थितीत झेंडा दाखवून औपचारिक प्रारंभ करण्यात आला. या वेळी खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी रस्त्याच्या दुतर्फा मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.

पहिल्या टप्प्यात एकूण ९१.८ किलोमीटरचे अंतर असून हा टप्पा पिंपरी-चिंचवड महानगरपालिका क्षेत्रासह मुळशी आणि मावळ तालुक्यातील घाट-वळण रस्त्यांवरून पार पडला. निसर्गरम्य परिसर, तीव्र वळणे, चढ-उतार आणि अरुंद रस्ते यांमुळे सायकलपटूंना वेग, सहनशक्ती आणि तांत्रिक कौशल्याचा कस लागला.

माण–अंबवडे, पौड, कोळवण, हडशी लेक, तिकोना पेठ, काले, आढळे बुद्रुक, कासारसाई, मारुंजी आदी मार्गांवरून स्पर्धकांनी मार्गक्रमण केले. दुपारी सुमारे ४ वाजता डॉ. डी. वाय. पाटील आंतरराष्ट्रीय इन्स्टिट्यूट, आकुर्डी येथे या टप्प्याचा समारोप झाला.

स्पर्धेसाठी जिल्हा प्रशासनाने व्यापक तयारी केली होती. वाहतूक व्यवस्थापन, सुरक्षा, आरोग्य सेवा, आपत्कालीन सुविधा यांचे काटेकोर नियोजन करण्यात आले होते. मार्गावर पोलिस बंदोबस्त, वैद्यकीय पथके, रुग्णवाहिका, तांत्रिक मदत वाहने आणि रिफ्रेशमेंट पॉइंट्स तैनात होते. ड्रोन, सीसीटीव्ही कॅमेरे आणि मोटरसायकल पथकांद्वारे सातत्याने निरीक्षण करण्यात आले.

समारोपस्थळी सायकलपटूंचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. अनेक आंतरराष्ट्रीय खेळाडूंनी घाटरस्त्यांची रचना, निसर्गसौंदर्य आणि भारतीय प्रेक्षकांचा उत्साह अविस्मरणीय असल्याचे मत व्यक्त केले. पुणे जिल्ह्यातील घाट-वळण रस्ते जागतिक दर्जाच्या सायकल स्पर्धांसाठी अत्यंत योग्य असल्याचेही त्यांनी नमूद केले.

जिल्ह्यातील पर्यटनस्थळांना जागतिक ओळख मिळावी, स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना मिळावी आणि तरुणांसाठी क्रीडा व पर्यटन क्षेत्रात रोजगाराच्या संधी निर्माण व्हाव्यात, या उद्देशाने ‘बजाज पुणे ग्रँड टूर–२०२६’चे आयोजन करण्यात आले आहे. पहिला टप्पा यशस्वी ठरल्याने आगामी टप्प्यांबाबत सायकलप्रेमींमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Call Now Button