
पुणे, दि. २० : बजाज पुणे ग्रँड टूर अंतर्गत आज पहिल्या टप्प्याची सुरुवात टी.सी.एस. सर्कल, हिंजेवडी येथून मोठ्या उत्साहात झाली. आंतरराष्ट्रीय दर्जाच्या या सायकल स्पर्धेला पुणेकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. अबालवृद्ध नागरिकांनी रस्त्यांच्या दुतर्फा उभे राहत सायकलपटूंना टाळ्यांच्या गजरात प्रोत्साहन दिले.
या स्पर्धेमुळे नागरिकांना नामवंत आंतरराष्ट्रीय सायकलपटूंची तंदुरुस्ती, शिस्तबद्ध तयारी आणि वेगवान कौशल्य प्रत्यक्ष पाहण्याची दुर्मिळ संधी मिळाली. पुण्यात प्रथमच होत असलेल्या या आंतरराष्ट्रीय स्पर्धेमुळे पर्यावरण संरक्षण, आरोग्य संवर्धन आणि सायकलिंग संस्कृतीचा प्रभावी संदेश समाजात पोहोचल्याचे दिसून आले. विशेषतः तरुणाईमध्ये या स्पर्धेमुळे नवी ऊर्जा आणि प्रेरणा निर्माण झाली.
स्पर्धेच्या यशस्वी आयोजनाबद्दल जिल्हा प्रशासनाच्या नियोजनाचे नागरिकांनी विशेष कौतुक केले. मुंबईहून आलेले फैजान अन्सारी म्हणाले, “भारतीय म्हणून अशा आंतरराष्ट्रीय स्पर्धेचा अनुभव घेणे अभिमानास्पद आहे. तरुण पिढीने निरोगी आयुष्यासाठी सायकलचा अधिक वापर करायला हवा.”
राजस्थानचे संतोष वर्मा यांनी पुण्याच्या ऐतिहासिक वारशाचा उल्लेख करत सांगितले की, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या भूमीत बजाज पुणे ग्रँड टूरचे आयोजन होणे ही गौरवाची बाब आहे. स्पर्धेच्या मार्गावर असलेले गडकिल्ले हा इतिहास अनुभवण्याचा अनोखा क्षण ठरत असल्याचे त्यांनी नमूद केले.
स्पर्धेच्या अनुषंगाने करण्यात आलेली सजावट, स्वच्छ व सुस्थितीत असलेले रस्ते यामुळे हिंजेवडीसह पुणे परिसराचे सौंदर्य अधिक खुलले. सदृढ समाजनिर्मितीसाठी अशा आंतरराष्ट्रीय सायकल स्पर्धा उपयुक्त ठरतात, अशी भावना नागरिकांनी व्यक्त केली.
हिंजेवडी ग्रामपंचायतीकडून शाळा-महाविद्यालयांमध्ये स्पर्धेची माहिती देण्यात आल्याने शिक्षक व विद्यार्थ्यांमध्ये विशेष उत्सुकता निर्माण झाली. स्थानिक शिक्षिका अश्विनी पवार यांनी सांगितले की, जागतिक दर्जाचे खेळाडू प्रत्यक्ष पाहिल्याने विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळाली असून भविष्यात उत्तम खेळाडू घडविण्यास मदत होईल.
माजी सैनिक रमेश मधुरे यांनी बजाज पुणे ग्रँड टूर हे पुण्यासाठी अभिमानास्पद आयोजन असल्याचे सांगत सायकलचा वापर निरोगी जीवनासाठी अत्यावश्यक असल्याचे अधोरेखित केले. तरुणाईचाही स्पर्धेला मोठा प्रतिसाद दिसून आला. माहेश्वरी भताणे यांनी या स्पर्धेपासून प्रेरणा घेत भविष्यात आंतरराष्ट्रीय सायकल स्पर्धेत सहभागी होण्याचा आत्मविश्वास व्यक्त केला.
जनार्धन शिवरकर यांनी या स्पर्धेमुळे पुण्याच्या नावलौकिकात भर पडत असल्याचा आनंद व्यक्त केला. सुनील डांगमाळी यांनी “सायकल चालवा, आजाराला पळवा; पर्यावरण वाचवा आणि वाहतूक कोंडी कमी करा,” असा संदेश देत नागरिकांना सायकल वापराचे आवाहन केले.