
पुणे : पुणे जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा राजकीय धक्का बसला असून, शिरुरचे माजी आमदार राजेंद्र गावडे यांनी आपल्या असंख्य समर्थक व कार्यकर्त्यांसह भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे. यांच्यासोबत जिल्हा परिषदेच्या बालकल्याण समितीच्या सभापती सुनीताताई गावडे तसेच शिरुरच्या माजी नगराध्यक्षा मनीषा गावडे यांनीही भाजपमध्ये प्रवेश केला.
राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी पक्षप्रवेश करणाऱ्या सर्व नेत्यांचे भाजपमध्ये स्वागत करून त्यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी पुणे उत्तर जिल्हाध्यक्ष प्रदीपदादा कंद, आमदार राहुल कुल, पुणे दक्षिण जिल्हाध्यक्ष शेखर वडणे, माजी आमदार संजय जगताप, प्रवीण माने, जयश्रीताई पलांडे, धर्मेंद्र खांडरे यांच्यासह पक्षाचे प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी बोलताना मंत्री चंद्रकांतदादा पाटील म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विकासाभिमुख नेतृत्वामुळे देशभरात भाजपाला अभूतपूर्व प्रतिसाद मिळत आहे. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या गतिमान व प्रभावी कारभारामुळे महाराष्ट्रात भाजपाला जनतेचा भरभरून पाठिंबा मिळत आहे.
भारतीय जनता पक्ष हा कार्यकर्त्यांचा पक्ष असून, प्रत्येक कार्यकर्त्याचा सन्मान राखण्याची परंपरा भाजपमध्ये आहे. माजी आमदार राजेंद्र गावडे यांनाही पक्षात योग्य तो सन्मान दिला जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.
दरम्यान, सुनीताताई गावडे यांनी भाजप प्रवेशामागची भूमिका स्पष्ट करताना सांगितले की, राष्ट्रवादी काँग्रेस वाढवण्यासाठी गावडे कुटुंबीयांनी प्रामाणिक मेहनत घेतली. मात्र पक्ष नेतृत्वाकडून सातत्याने उपेक्षेची वागणूक मिळाल्याने आम्ही भाजपच्या विकासाच्या अजेंड्यावर विश्वास ठेवून भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला.