
पुणे:महापालिका निवडणुकीत प्रभाग क्रमांक २४ मधून दणदणीत विजय मिळवलेल्या भाजपचे नगरसेवक व माजी सभागृह नेते गणेश बिडकर यांनी विजयाचा जल्लोष बाजूला ठेवत थेट विकासकामांना गती देण्यास सुरुवात केली आहे. निकाल जाहीर झाल्यानंतर अवघ्या काही तासांतच बिडकर यांनी पुणे महापालिकेचे आयुक्त नवल किशोर राम यांची भेट घेत विकास अजेंड्यावर सविस्तर चर्चा केली.प्रभाग २४ मधील प्रलंबित व प्रस्तावित विकासकामांची सविस्तर यादी घेऊन बिडकर आयुक्त कार्यालयात दाखल झाले होते. यावेळी प्रभागातील रस्त्यांची दुरवस्था, पाणीपुरवठा, ड्रेनेज व्यवस्था, स्वच्छता, तसेच कमला नेहरू रुग्णालयातील आरोग्य सुविधांचा दर्जा वाढवण्याबाबत सखोल चर्चा करण्यात आली.या बैठकीला प्रभागातून विजयी झालेले भाजपचे नगरसेवक देवेंद्र उर्फ छोटू वडके, उज्वला यादव आणि कल्पना बहिरट हेही उपस्थित होते. नागरिकांना भेडसावणाऱ्या समस्या तातडीने सोडवून विकासकामांना वेग देण्यावर सर्वांनी एकमताने भर दिला.यावेळी बोलताना गणेश बिडकर म्हणाले,“निवडणुकीतील विजय हा केवळ उत्सवाचा विषय नाही, तर तो मोठी जबाबदारीही आहे. नागरिकांनी दाखवलेला विश्वास अबाधित ठेवण्यासाठी प्रभागासह संपूर्ण पुणे शहरातील मूलभूत सुविधा, आरोग्यसेवा आणि पायाभूत विकासकामांना सर्वोच्च प्राधान्य देणार आहे. सर्व नगरसेवकांना सोबत घेऊन प्रभागाचा सर्वांगीण विकास साधण्याचा आमचा निर्धार आहे.”