पुणे ग्रँड टूरच्या निमित्ताने शहराच्या भिंती ‘बोलक्या’; क्रीडा आणि संस्कृतीचा अनोखा संगम

पुणे, दि. २० – पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरात सुरू असलेल्या ‘बजाज पुणे ग्रँड टूर २०२६’ या ऐतिहासिक आंतरराष्ट्रीय सायकलिंग स्पर्धेच्या निमित्ताने शहराच्या भिंती अक्षरशः बोलू लागल्या आहेत. शहराचे सौंदर्य वाढवणे आणि नागरिकांमध्ये खेळाप्रती जागृती निर्माण करणे, या उद्देशाने पुणे व पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने विविध ठिकाणी आकर्षक भित्तिचित्रे साकारण्यात आली आहेत. त्यामुळे रस्ते केवळ रहदारीचे मार्ग न राहता, ते आता एक खुले कलादालन झाल्याचे चित्र दिसत आहे.

या भित्तिचित्रांमधून जागतिक आणि भारतीय खेळाडूंच्या कामगिरीला उजाळा देण्यात आला आहे. २०२० च्या रोड वर्ल्ड चॅम्पियन इटलीची एलिसा बालसामो, जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत सहभागी होणारे पहिले भारतीय रोड सायकलपटू अरविंद पवार, २०२५ च्या ट्रॅक आशिया कपमध्ये सुवर्णपदक जिंकणारी हर्षिता जाखड, तसेच अल्ट्रा-सायकलपटू कबीर यांच्या संघर्षकथा भिंतींवर प्रभावीपणे मांडण्यात आल्या आहेत. ही चित्रे विशेषतः तरुण पिढीसाठी प्रेरणादायी ठरत आहेत.

खेळासोबतच महाराष्ट्राची समृद्ध संस्कृतीही या भित्तिचित्रांतून अधोरेखित करण्यात आली आहे. ‘वारी’, पारंपरिक वेशभूषा, तसेच ‘Women of Pune’ या संकल्पनेखाली बास्केटबॉल, वेटलिफ्टिंग, योग, टेनिस खेळणाऱ्या महिलांची चित्रे साकारण्यात आली आहेत. ‘भारतातील पहिली जागतिक सायकलिंग स्पर्धा’ असा संदेश देणारी ही भित्तिचित्रे पुण्याला जागतिक क्रीडा नकाशावर अधोरेखित करत आहेत.

महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आलेल्या या उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. रंग, कला आणि संस्कृतीचा हा संगम पाहून पुणेकर अभिमान व्यक्त करत असून, सायकलिंग आणि व्यायामासाठी शहरात अधिक सकारात्मक व प्रेरणादायी वातावरण निर्माण झाले आहे. ‘बजाज पुणे ग्रँड टूर’च्या निमित्ताने साकारलेला हा कलेचा आविष्कार पुणे आणि पिंपरी-चिंचवडसाठी खऱ्या अर्थाने क्रीडा उत्सवाची पर्वणी ठरत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Call Now Button