
पुणे : निवडणूक प्रक्रियेत परस्परांवर टीका-टिप्पणी होणे साहजिक असले, तरी निवडणूक संपल्यानंतर मतभेद बाजूला ठेवून एकत्र येण्याची सकारात्मक भूमिका अलीकडे दुर्मिळ होत चालली आहे. मात्र औंध-बोपोडी प्रभागातील नवनिर्वाचित नगरसेवक चंद्रशेखर उर्फ सनी निम्हण यांनी ही परंपरा मोडत, “लढाई संपली आता सर्वजण एकत्र येऊ… आपल्या औंध-बोपोडीला विकासात अग्रेसर ठेऊ,” असा संदेश देत आपल्या विरोधी उमेदवारांची सदिच्छा भेट घेतली.
या भेटीदरम्यान सनी निम्हण यांनी माजी उमेदवार प्रकाशजी ढोरे यांची भेट घेतली. यावेळी विनायक रणपिसे उपस्थित होते. निवडणुकीनंतरही राजकीय सलोखा जपत विकासावर भर देण्याचा हा प्रयत्न नागरिकांमध्ये चर्चेचा विषय ठरत आहे.
यासंदर्भात बोलताना सनी निम्हण म्हणाले, “निवडणुका येतात-जातात. ही लढाई व्यक्तीविरोधात नसून विचारांची असते, असे मी मानतो. निवडणुकीतील धामधुमीनंतर आज प्रकाशजी ढोरे यांची सदिच्छा भेट घेऊन पुढील काळातील विकासाबाबत विचारांची देवाणघेवाण केली.”
औंध-बोपोडी परिसराचा नियोजनबद्ध आणि सर्वांगीण विकास करण्यासाठी परस्पर सहकार्य व मार्गदर्शन महत्त्वाचे ठरेल, असेही त्यांनी स्पष्ट केले. वैचारिक मतभेद असले तरी परिसराच्या विकासासाठी सर्वांनी एकत्र येणे आवश्यक असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.
“सर्वांना सोबत घेऊन, सर्वांच्या सहभागातून विकास करणे हीच स्वर्गीय कार्यसम्राट आमदार विनायक निम्हण यांची शिकवण असून, त्याच संस्कारांची प्रेरणा मला कायम मिळत असते,” असेही सनी निम्हण यांनी नमूद केले.