
पुणे : देशातील व्यावसायिक बास्केटबॉलला भक्कम व्यासपीठ देण्याच्या उद्देशाने एसीजी स्पोर्ट्स आणि एबीसी बास्केटबॉल डेवलपमेंट लीग यांच्यात महत्त्वपूर्ण भागीदारी करण्यात आली आहे. या सहकार्याअंतर्गत महाराष्ट्र बास्केटबॉल लीगचे आयोजन १४ ते २१ मार्च २०२६ दरम्यान पुण्यातील खराडी येथील राजाराम भिकू पठारे स्टेडियममध्ये होणार आहे. या स्पर्धेत मुलांच्या आठ आणि मुलींच्या पाच संघांचा सहभाग असणार आहे.
युवा खेळाडूंना व्यावसायिक वातावरण, उच्च दर्जाचे प्रशिक्षण आणि सातत्यपूर्ण स्पर्धात्मक अनुभव मिळावा, हा या लीगचा मुख्य उद्देश आहे. त्यामुळे खेळाडूंना राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर पुढे जाण्यासाठी योग्य संधी उपलब्ध होणार आहे.
ही माहिती एसीजी स्पोर्ट्सचे स्ट्रॅटेजिक हेड राहुल झा आणि एबीसी बास्केटबॉल डेवलपमेंट लीगचे संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी अनिरुद्ध पोले यांनी विमाननगर येथील फोर पॉइंट्स शेराटन हॉटेलमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत दिली. यावेळी केरल बास्केटबॉल संघाचे सचिव पी. सी. एंटनी, तेलंगणा बास्केटबॉल संघाचे सचिव पृथ्वी रेड्डी, दिल्ली बास्केटबॉल संघाचे अध्यक्ष मुकेश कालिया आणि महाराष्ट्र राज्य बास्केटबॉल संघाचे सचिव गोविंद मुथू कुमार उपस्थित होते.
अनिरुद्ध पोले यांनी सांगितले की, या संयुक्त उपक्रमातून राज्य व राष्ट्रीय पातळीवर बास्केटबॉलसाठी दीर्घकालीन विकासाचा मार्ग तयार केला जात आहे. २०२६ मध्ये महाराष्ट्र, केरल, दिल्ली आणि तेलंगणामध्ये अंडर-१४ आणि अंडर-१८ गटांसाठी एकूण सात लीग आयोजित करण्यात येणार असून पुढील टप्प्यात आंध्र प्रदेश, उत्तर प्रदेश आणि हरियाणा–चंदीगडमध्येही लीग सुरू करण्याचा मानस आहे.
राहुल झा यांनी स्पष्ट केले की, खेळाडूंच्या सर्वांगीण विकासासाठी संरचित लीग आणि उच्चस्तरीय प्रशिक्षण यांचा मेळ आवश्यक आहे. सातत्यपूर्ण कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना एसीजीच्या ‘हाय परफॉर्मन्स सेंटर्स’मध्ये ट्रायलची संधी मिळणार आहे.
या लीगसाठी अभिनेता सुनील शेट्टी आणि रणविजय सिंह यांची ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. विविध राज्यांतील बास्केटबॉल संघटनांनी या उपक्रमाचे स्वागत करत, भारतीय बास्केटबॉलच्या भविष्यासाठी ही संधी निर्णायक ठरेल, असा विश्वास व्यक्त केला आहे.