
पुणे, दि. 20 : पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (पिफ) २०२६ मध्ये यंदा आशयघन, प्रयोगशील आणि सामाजिक वास्तव मांडणाऱ्या चित्रपटांनी विशेष लक्ष वेधून घेतले. ‘तुम्बाड’नंतर दिग्दर्शक राही अनिल बर्वे यांचा प्रयोगशील थ्रिलर ‘मयसभा’ येथे प्रदर्शित झाला. २००७ साली पिफमध्ये प्रेक्षक म्हणून सहभागी झालेल्या बर्वे यांचा प्रवास आज स्वतःच्या चित्रपटाच्या स्क्रीनिंगपर्यंत पोहोचल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.
‘मयसभा’ हा कोणत्याही पारंपरिक चौकटीत न बसणारा वैयक्तिक प्रयोग असल्याचं बर्वे यांनी स्पष्ट केलं. विशेषतः चित्रपटाचा उत्तरार्ध अधिक प्रयोगशील असल्याने प्रेक्षकांना वेगळा अनुभव मिळतो. ही कथा बंद पडलेल्या थिएटरमध्ये घडते आणि ते थिएटरच कथेतलं सर्वात महत्त्वाचं पात्र ठरतं. अभिनेता जावेद जाफरी यांनी साकारलेला परमेश्वर खन्ना हा नायक किंवा खलनायक नसलेला गुंतागुंतीचा व्यक्तिरेखा-आकार आहे. केवळ २५ जणांच्या टीमने आणि २३ दिवसांत, कोणत्याही मोठ्या औद्योगिक पाठिंब्याशिवाय हा चित्रपट पूर्ण करण्यात आला.
कौटुंबिक वास्तव आणि मानसिक संघर्ष मांडणारा बंगाली-हिंदी चित्रपट ‘शॅडो बॉक्स’ देखील पिफमध्ये प्रदर्शित झाला. स्त्रीचा संघर्ष, माजी सैनिक पतीची सामाजिक उपेक्षा आणि एका घटनेनंतर नात्यांवर येणारा ताण हे या चित्रपटाचे केंद्रबिंदू आहेत. अभिनेता चंदन बिष्ट यांनी या चित्रपटातील स्त्रीच्या ताकदीवर भर दिला.
स्त्रीवाद आणि निसर्ग संवर्धन यांचा सुरेख संगम साधणारा श्रीलंकन दिग्दर्शक विमुक्ति जयसुंदरा यांचा ‘स्पायिंग स्टार्स’ चित्रपटही प्रेक्षकांच्या भेटीला आला. निसर्गाशी मानवी नातं आणि त्याच्या संवर्धनाचा संदेश देणाऱ्या या चित्रपटाला आंतरराष्ट्रीय संस्थांचा पाठिंबा लाभला आहे.
मल्याळम चित्रपट ‘अ प्रेग्नंट विडो’ गर्भवती विधवेच्या आयुष्यातील सामाजिक, प्रशासकीय आणि भावनिक संघर्ष मांडतो. दिग्दर्शक उन्नी के. आर. यांनी सहानुभूतीपेक्षा समजून घेण्याची जबाबदारी प्रेक्षकांवर सोपवली आहे.
तर १९९० च्या दशकातील स्थलांतरित कुटुंबाची कथा सांगणारा ‘ब्ल्यू हेरॉन’ हा चित्रपट एका लहान मुलीच्या निरागस नजरेतून भीती आणि अस्वस्थता उलगडतो. अभिनेत्री जी इरिंगो रेती यांनी या भूमिकेतील भावनिक आव्हाने प्रेक्षकांशी शेअर केली.
एकूणच, पिफ २०२६ ने विविध भाषांतील आणि देशांतील चित्रपटांच्या माध्यमातून सिनेप्रेमींना आशय, प्रयोग आणि संवेदनशीलतेची समृद्ध अनुभूती दिली.