
पुणे, दि. 19: बजाज पुणे ग्रँड टूर २०२६ या आंतरराष्ट्रीय सायकल स्पर्धेअंतर्गत आयोजित करण्यात आलेली ७.५ किलोमीटरची ‘प्रोलॉग रेस’ नामदार गोपाळ कृष्ण गोखले चौक ते जंगली महाराज रोडवरील केएफसी दरम्यान यशस्वीरीत्या पार पडली. या रेसचा पारितोषिक वितरण समारंभ नामदार गोपाळ कृष्ण गोखले चौक येथे जल्लोषपूर्ण वातावरणात पार पडला. मोठ्या संख्येने उपस्थित नागरिकांनी खेळाडूंचे उत्साहाने स्वागत केले.
भारतामधील पहिलीच UCI 2.2 श्रेणीतील बहुदिवसीय पुरुष रोड सायकलिंग स्पर्धा असलेल्या बजाज पुणे ग्रँड टूर २०२६ ची अधिकृत सुरुवात सोमवारी दुपारी या प्रोलेॉग टप्प्याने झाली. डेक्कन जिमखाना येथील नामदार गोपाळ कृष्ण गोखले चौक येथे या ऐतिहासिक स्पर्धेचा श्रीगणेशा झाला.
या वेळी पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार, विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार तसेच सायकलिंग फेडरेशन ऑफ इंडियाचे महासचिव दातो मनिंदर पाल सिंग यांच्या हस्ते विजेत्या खेळाडूंना पारितोषिकांचे वितरण करण्यात आले.
प्रोलॉग रेस निकाल
पाच दिवस चालणाऱ्या या स्पर्धेचा सूर निश्चित करणाऱ्या प्रोलेॉग रेसमध्ये भारतीय राष्ट्रीय विकास संघाचा सचिन देसाई दुपारी १.३० वाजता पहिला सायकलपटू म्हणून रस्त्यावर उतरला. प्रेक्षकांनी ‘सचिन, सचिन’च्या घोषणांनी त्याचे जोरदार स्वागत केले.
मात्र दिवसअखेर बाजी मारली ती मलेशियाच्या तेरेंगानू सायकलिंग टीमकडून खेळणाऱ्या ऑस्ट्रेलियन सायकलपटू फर्गस ब्राउनिंग याने. त्याने अवघ्या ०८:०५.८९ मिनिटांत ७.५ किमी अंतर पूर्ण करत सर्वात जलद वेळ नोंदवली. ताशी ५० किमीहून अधिक वेग राखत ब्राउनिंगने यलो जर्सी मिळवली असून मंगळवारी होणाऱ्या पहिल्या टप्प्यासाठी तो आघाडीवरून सुरुवात करणार आहे.
प्रोलेॉग जिंकल्यानंतर ब्राउनिंग म्हणाला,
“सुरुवातीपासूनच वेगावर भर दिला. भारतात पहिल्यांदाच अशा दर्जाची स्पर्धा होत आहे. आयोजन, रस्ते आणि सुरक्षा व्यवस्था अत्यंत उत्कृष्ट होती. पुढील डोंगराळ टप्प्यांची उत्सुकता आहे.”
ऑस्ट्रेलियाचाच डिलन हॉपकिन्स (०८:०६.३३) दुसऱ्या, तर एस्टोनियाचा आंद्रियास मिल्टियाडिस (०८:०८.९२) तिसऱ्या क्रमांकावर राहिला. बेल्जियमचा यॉर्बन लॉरिसन चौथ्या, तर तेरेंगानू संघाचा झेब किफिन पाचव्या स्थानावर राहिला.
भारतीय सायकलपटूंची आश्वासक कामगिरी
भारतीय संघाकडून हर्षवीर सिंग सेखों (भारतीय राष्ट्रीय संघ) याने ०८:४२.०७ वेळ नोंदवत सर्वोत्कृष्ट भारतीय आणि तिसरा सर्वोत्कृष्ट आशियाई सायकलपटू म्हणून मान मिळवला. त्याला स्टेज १ साठी २६वे प्रारंभस्थान मिळाले.
तसेच विश्वजीत सिंग (०८:४७.३३) आणि नवीन जॉन (०८:४९.४४) यांनी अनुक्रमे ३५वे व ४३वे स्थान मिळवत आंतरराष्ट्रीय स्तरावर भारतीय सायकलिंगची भक्कम उपस्थिती अधोरेखित केली. जागतिक दर्जाच्या खेळाडूंविरुद्ध मिळालेला हा अनुभव भारतीय सायकलिंगसाठी निश्चितच मोलाचा ठरणार आहे.