
पुणे : मराठी चित्रपटसृष्टीसाठी २०२६ हे वर्ष अभिमानास्पद ठरत असून, आगामी मराठी चित्रपट ‘बाप्या’ याची पुणे इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल (PIFF) २०२६ मधील ‘मराठी सिनेमा कॉम्पिटिशन’ विभागात अधिकृत निवड झाली आहे. आशयघन, संवेदनशील आणि सामाजिक भान जपणाऱ्या कथांसाठी ओळखल्या जाणाऱ्या मराठी चित्रपटांना आंतरराष्ट्रीय स्तरावर मिळणाऱ्या मान्यतेच्या दृष्टीने ही निवड महत्त्वाची मानली जात आहे.
दिग्दर्शक समीर तिवारी यांचा ‘बाप्या’ हा चित्रपट दापोली येथील एका लहान मासेमार कुटुंबाच्या जीवनाभोवती फिरतो. कुटुंबातील नातेसंबंध, समाजाचा दृष्टिकोन आणि वैयक्तिक संघर्ष यांचा हळुवारपणे वेध घेत ही कथा उलगडते. भावनिक संवेदनशीलता, सूक्ष्म विनोद आणि सामाजिक भाष्य यांचा सुंदर समतोल साधत ‘बाप्या’ प्रेक्षकांना एका वेगळ्या भावविश्वात घेऊन जातो.
या चित्रपटाची निर्मिती मुक्तल तेलंग आणि समीर तिवारी यांनी केली असून, चित्रपटात गिरीश कुलकर्णी, राजश्री देशपांडे, देविका दफ्तरदार, श्रीकांत यादव आणि आर्यन मेंगजी यांच्या प्रमुख भूमिका आहेत.
चित्रपटाच्या निवडीबद्दल बोलताना दिग्दर्शक समीर तिवारी म्हणाले,
“‘बाप्या’ ही माणुसकी, स्वीकार आणि नात्यांची गोष्ट आहे. ‘पिफ्फ’सारख्या प्रतिष्ठित व्यासपीठावर आमच्या चित्रपटाची निवड होणे हे संपूर्ण टीमसाठी मोठे प्रोत्साहन आहे. मराठी चित्रपटांच्या संवेदनशील कथा आता जागतिक स्तरावर पोहोचत आहेत, याचा आम्हाला अभिमान आहे.”
पिफ्फ २०२६ मधील या निवडीमुळे ‘बाप्या’कडून मराठी चित्रपटप्रेमींमध्ये अधिक उत्सुकता निर्माण झाली असून, हा चित्रपट जागतिक प्रेक्षकांपर्यंत पोहोचण्याच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल टाकत असल्याचे मानले जात आहे.