
पुणे : हिराबाग हाउसिंग सोसायटी येथील एसआरए प्रकल्पात डक्टमध्ये साठणाऱ्या कचऱ्यामुळे निर्माण झालेली अस्वच्छतेची गंभीर समस्या नवनिर्वाचित नगरसेवक राघवेंद्र बाप्पु मानकर यांनी अवघ्या २४ तासांत मार्गी लावली आहे. आचारसंहिता संपल्यानंतर तातडीने निर्णय घेत संपूर्ण इमारतीतील डक्टमध्ये कचरा टाकण्यास अटकाव करण्यासाठी जाळ्या बसवण्याच्या कामाला सुरुवात करण्यात आली आहे.
निवडणूक प्रचारादरम्यान हिराबाग सोसायटीतील रहिवाशांनी ही समस्या मानकर यांच्या निदर्शनास आणून दिली होती. निवडणुकीनंतर प्राधान्याने हा प्रश्न सोडवण्याचे आश्वासन त्यांनी दिले होते. त्या अनुषंगाने त्यांनी प्रत्यक्ष सोसायटीला भेट देत पाहणी केली आणि कायमस्वरूपी उपाययोजना राबवण्याचा निर्णय घेतला.
डक्टमध्ये सातत्याने कचरा साठत असल्याने दुर्गंधी, डासांचा प्रादुर्भाव आणि आरोग्याच्या तक्रारी वाढल्या होत्या. वारंवार स्वच्छता करूनही समस्या कायम राहात असल्याने, प्रत्येक मजल्यावर डक्ट बंद करण्यासाठी जाळ्या बसवण्याचा निर्णय घेण्यात आला. विशेष म्हणजे, निर्णय झाल्यानंतर २४ तासांतच प्रत्यक्ष काम सुरू करण्यात आले आहे.
या अंतर्गत प्रथम संपूर्ण डक्टची स्वच्छता करून घेण्यात आली असून, इमारतीतील ९ मजल्यांवर सुमारे ६०० हून अधिक जाळ्या बसवण्यात येणार आहेत. यासोबतच नागरिकांना डस्टबिनचे वाटप करून ओला व सुका कचरा वर्गीकरणाबाबत जनजागृती केली जाणार आहे.
दिलेल्या शब्दाची तात्काळ पूर्तता केल्याबद्दल सोसायटीतील रहिवाशांनी नगरसेवक राघवेंद्र बाप्पु मानकर यांचे आभार मानले. यावेळी हिराबाग सोसायटीचे शंकर तावरे, सचिन मुजुमले, संदीप गायकवाड, संतोष वाटमकर, पांडुरंग जावळकर, दत्ता इंगळे यांच्यासह सोसायटीतील सदस्य व रहिवासी उपस्थित होते.