
पुणे, दि. 19 : आंतरराष्ट्रीय दर्जाच्या बजाज पुणे ग्रँड टूर स्पर्धेचे आयोजन अत्यंत चोख, शिस्तबद्ध आणि व्यावसायिक पद्धतीने करण्यात आल्याने जगभरातून आलेल्या सायकलस्वारांनी समाधान व्यक्त केले आहे. उत्तम रस्ते, उत्कृष्ट ट्रॅक, दर्जेदार निवास-भोजन व्यवस्था आणि पुणेकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद यामुळे स्पर्धेचा अनुभव अविस्मरणीय ठरत असल्याच्या प्रतिक्रिया विदेशी खेळाडूंनी दिल्या.
ऑस्ट्रेलियातील हेडन जेम्स (टीम नेक्स्ट वेलोफिट) म्हणाले, “पुण्यात येऊन खूप आनंद झाला. स्पर्धेचे नियोजन अतिशय उत्तम आहे. पहिल्या टप्प्याच्या मार्गाची पाहणी केली असून रस्ते सायकलिंगसाठी आदर्श आहेत. इथली राहण्याची व्यवस्था, जेवण आणि लोकांचे प्रेम खूपच छान आहे. आता प्रत्यक्ष शर्यतीसाठी आम्ही उत्सुक आहोत.”
एस्टोनियाचा तरुण सायकलस्वार तावी कन्निमे (क्विक प्रो टीम) यानेही अनुभव शेअर करताना सांगितले, “मी नुकताच व्यावसायिक सायकलस्वार झालो असून करिअरच्या सुरुवातीलाच भारतात येऊन इतक्या मोठ्या स्पर्धेत सहभागी होतोय, याचा अभिमान वाटतो. पुण्यातील निसर्ग, ट्रॅक आणि वातावरण अप्रतिम आहे. लोक आमचा उत्साह वाढवत आहेत, हे खूप प्रेरणादायी आहे.”
ऑस्ट्रेलियाच्या जॉन याने रस्त्यांच्या गुणवत्तेचे कौतुक करताना सांगितले, “येथील रस्ते गुळगुळीत, वेगवान आणि सायकलिंगसाठी अतिशय योग्य आहेत. आजचा मार्ग सोपा होता, मात्र उद्या काही कठीण चढाव आहेत, त्यासाठी आम्ही सज्ज आहोत. पुण्यातील प्रेक्षकांचा प्रतिसाद थक्क करणारा आहे.”
मलेशियाचा की झे यी (टीएसजी शिमानो तेरेन्गानू) म्हणाला, “भारताला भेट देण्याची ही माझी पहिलीच वेळ आहे. येथील लोक खूप मनमिळावू आणि खिलाडू वृत्तीचे आहेत. रेस रूट उत्कृष्ट असून रस्त्यांची स्थिती सायकलिंगसाठी पोषक आहे. सुट्टी घालवण्यासाठीही भारत एक उत्तम ठिकाण आहे.”
आंतरराष्ट्रीय सायकलस्वारांच्या या सकारात्मक प्रतिक्रियांमुळे बजाज पुणे ग्रँड टूर ही स्पर्धा जागतिक पातळीवर पुण्याची ओळख अधिक भक्कम करत असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.