पुणे महापालिकेत ‘जेन झी’चा प्रवेश; २२ वर्षीय भाजपच्या सई थोपटे यांचा ऐतिहासिक विजय

पुणे, दि. 19 : पुणे महानगरपालिका निवडणूक २०२६ च्या निकालात भारतीय जनता पक्षाच्या (BJP) २२ वर्षीय सई थोपटे यांनी ऐतिहासिक विजय मिळवत नवा राजकीय अध्याय रचला आहे. या विजयासह त्या पुणे महापालिकेच्या इतिहासातील सर्वात तरुण नगरसेविका ठरल्या असून, महापालिकेत ‘जेन झी’ पिढीचे प्रभावी प्रतिनिधित्व करणारे नवे नेतृत्व समोर आले आहे.

सई थोपटे यांनी प्रभाग क्रमांक ३६ (धनकवडी–सहकारनगर–पद्मावती) मधून दणदणीत विजय मिळवला. त्यांनी एकूण २०,७९७ मते मिळवत प्रतिस्पर्धी उमेदवारांचा मोठ्या फरकाने पराभव केला. प्रचाराच्या काळात त्यांचा उत्साह, थेट संवाद आणि तरुणाईशी असलेली नाळ मतदारांना विशेष भावली.

विशेष बाब म्हणजे, भाजपने उमेदवारी जाहीर केली त्या वेळी सई थोपटे या पुण्यातील सिम्बायोसिस महाविद्यालयात बीबीए (BBA) अंतिम वर्षाच्या लेक्चरमध्ये उपस्थित होत्या. शिक्षण आणि राजकारण यांचा समतोल साधत त्यांनी निवडणूक लढवली आणि विजय मिळवला.

राजकीय पार्श्वभूमीची सांगड घालणाऱ्या सई थोपटे यांच्या वडिलांचे नाव प्रशांत थोपटे असून ते भाजपचे सक्रिय पदाधिकारी आहेत. त्यांनी पर्वती विधानसभा मतदारसंघात विविध संघटनात्मक जबाबदाऱ्या सांभाळल्या आहेत. मात्र, सई यांनी स्वतःची वेगळी ओळख निर्माण करत निवडणूकपूर्व काळात अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (ABVP) च्या माध्यमातून विद्यार्थी चळवळीत सक्रिय सहभाग घेतला होता.

तरुणाईचे प्रश्न, शिक्षण, महिला सक्षमीकरण आणि स्थानिक नागरी सुविधांवर लक्ष केंद्रित करण्याचा संकल्प त्यांनी व्यक्त केला आहे. पुणे महापालिकेत त्यांच्या प्रवेशामुळे नव्या पिढीच्या अपेक्षा, विचार आणि ऊर्जा प्रशासनात प्रतिबिंबित होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Call Now Button