मानसी नाईकच्या मध्यवर्ती भूमिकेत ‘मन आतले मनातले’; १३ फेब्रुवारीला प्रेक्षकांच्या भेटीला

पुणे, दि. 19: आशयसंपन्न आणि भावनात्मक कथांवर आधारित मराठी चित्रपटांच्या यादीत आणखी एका दर्जेदार चित्रपटाची भर पडत आहे. उत्तम कथा आणि तगड्या स्टारकास्टसह ‘मन आतले मनातले’ हा मराठी चित्रपट येत्या १३ फेब्रुवारी रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकतेच या चित्रपटाचे आकर्षक पोस्टर सोशल मीडियावर प्रदर्शित करण्यात आले असून, चित्रपटाबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.

सूर्य फिल्म वर्ल्ड प्रस्तुत या चित्रपटाची निर्मिती सुरेन महापात्रा यांनी केली आहे. चित्रपटाची कथा व पटकथा स्वतः सुरेन महापात्रा यांनी लिहिली असून, संवादलेखनाची जबाबदारी मनोज सुधाकर येऊनकर यांनी सांभाळली आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन जेम्स अँथनी यांनी केले आहे.

चित्रपटाच्या संगीताची धुरा अभिजित मजुमदार यांनी सांभाळली असून, गीतलेखन डॉ. सुनंदा डिवरे पळवणकर यांनी केले आहे. सुदर्शन सेनापती यांचे छायांकन, तर मलया आणि बिपिन यांचे संकलन चित्रपटाला अधिक परिणामकारक बनवते.

या चित्रपटात अभिनेत्री मानसी नाईक मध्यवर्ती भूमिकेत झळकणार असून, त्यांच्यासोबत सुरेन महापात्रा, उपेंद्र लिमये, ऋतुराज फडके, संदीप गायकवाड, कमलेशन सावंत, अरुण नलावडे, यतीन कार्येकर, सिया पाटील, राजेश आहेर आणि विनित भोंडे अशी दमदार स्टारकास्ट आहे.

‘मन आतले मनातले’ या चित्रपटातून मानवी आयुष्यातील विविध पदर, भावभावना, नातेसंबंध आणि अंतर्मनातील संघर्ष प्रभावीपणे मांडण्यात आले आहेत. नावीन्यपूर्ण कथा आणि सशक्त अभिनयामुळे हा चित्रपट प्रेक्षकांचे मनोरंजन करताना त्यांना विचार करायला लावणारा ठरणार आहे.

ओडिया, हिंदी, तेलुगू, तमिळ आणि बंगाली भाषांतील चित्रपटांची निर्मिती केलेल्या सूर्य फिल्म वर्ल्ड या निर्मिती संस्थेचे हे पहिले मराठी चित्रपट पदार्पण असून, ‘मन आतले मनातले’कडून मोठ्या अपेक्षा व्यक्त केल्या जात आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Call Now Button