
पुणे, दि.18 : आंतरराष्ट्रीय दर्जाच्या ‘बजाज पुणे ग्रँड टूर २०२६’ या भव्य सायकल स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर पुणे व पिंपरी-चिंचवड शहरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. जगभरातील विविध देशांतून येणाऱ्या नामांकित सायकलपटूंच्या स्वागतासाठी शहरभर आकर्षक आणि कलात्मक सजावट करण्यात आली असून, पुणेकरांमध्ये मोठी उत्सुकता पाहायला मिळत आहे.
शहरातील प्रमुख रस्ते, चौक, प्रवेशद्वारे आणि सार्वजनिक ठिकाणी रंगीत रांगोळ्या, आधुनिक कलाकृती, सायकलिंगचा संदेश देणारी दृश्यात्मक सजावट उभारण्यात आली आहे. काही ठिकाणी रात्रीच्या वेळेस विशेष प्रकाशयोजनेतून भव्य सायकल आकृती साकारण्यात आल्या असून, त्या पुण्याच्या क्रीडा आणि सांस्कृतिक ओळखीला नवा आयाम देत आहेत.
पुणे कॅम्प, औंध, बाणेर, हिंजवडी तसेच पिंपरी-चिंचवड परिसरातील प्रमुख मार्गांवर रस्ते सौंदर्यीकरण, रंगकाम व सजावटीची कामे अंतिम टप्प्यात आहेत. ही सजावट पाहण्यासाठी नागरिक थांबून कौतुक व्यक्त करत असून, शहरात उत्सवसदृश वातावरण निर्माण झाले आहे.
आंतरराष्ट्रीय सायकल स्पर्धेच्या निमित्ताने पुणे शहर पुन्हा एकदा जागतिक नकाशावर ठळकपणे झळकणार असून, ही स्पर्धा केवळ क्रीडा क्षेत्रापुरती मर्यादित न राहता पर्यटन, संस्कृती आणि शहराच्या जागतिक प्रतिमेला चालना देणारी ठरणार आहे. पुणेकरांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे या आयोजनाला वेगळेच वैभव प्राप्त झाले आहे.