डिजिटल व्यासपीठ आणि छोट्या महोत्सवांतच स्थानिक चित्रपटांचे भविष्य – गोरान राडोवानोविच

पुणे, दि. १८ : मोठ्या बजेटचे चित्रपट, भव्य महोत्सव आणि पुरस्कारांच्या मागे न लागता स्थानिक प्रश्न, आपल्या भागातील कथा आणि कमी खर्चात तयार होणारे चित्रपट हेच भविष्यात टिकतील, असा ठाम सल्ला सर्बियाचे ज्येष्ठ दिग्दर्शक गोरान राडोवानोविच यांनी दिला. पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (PIFF) ‘प्रादेशिक चित्रपटांसाठी धडे’ या विषयावर त्यांनी व्याख्यान दिले. यावेळी महोत्सवाचे अध्यक्ष डॉ. जब्बार पटेल उपस्थित होते.

राडोवानोविच म्हणाले, “मोठ्या विषयांच्या आणि खर्चिक चित्रपटांच्या मोहात अडकू नका. आपल्या परिसरातील प्रश्न, स्थानिक कथा आणि माणसांचे जगणे यावर आधारित छोटे चित्रपट तयार करा. तुम्हाला समाधान देणाऱ्या विषयांवर काम करा. पुरस्कार आणि मोठ्या चित्रपट महोत्सवांच्या मागे धावण्यापेक्षा छोटे कलात्मक चित्रपट महोत्सव आणि डिजिटल व्यासपीठे अधिक महत्त्वाची आहेत. तिथे तुमचे चित्रपट घेऊन जा, छोट्या देशांमध्ये दाखवा आणि स्वतःची व्यासपीठे उभी करा.”

रशिया तसेच ब्रिक्स देश स्वतंत्र आणि कलात्मक चित्रपटांना पुढे आणण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे त्यांनी नमूद केले.
युरोपमधील परिस्थितीवर भाष्य करताना ते म्हणाले की, मोठ्या चित्रपट महोत्सवांत पुरस्कार न मिळाल्यास आजच्या घडीला कलात्मक चित्रपटांसाठी युरोपमध्ये काळ कठीण आहे. विविध देश एकत्र येऊन चित्रपट निर्मिती करत आहेत, मात्र व्यावसायिक विचारांमुळे वितरणाची मोठी समस्या निर्माण झाली. मोठी नावे, मोठे वितरक किंवा विशिष्ट राजकीय भूमिका नसल्यास प्रवेश मिळणे अवघड झाले आहे. त्यामुळे स्वतंत्र चित्रपट दिग्दर्शक छोट्या महोत्सवांकडे आणि डिजिटल माध्यमांकडे वळत आहेत.

चित्रपट इतिहासाचा आढावा घेताना त्यांनी सांगितले की दुसऱ्या महायुद्धानंतर अमेरिकन व युरोपियन चित्रपटांमध्ये फारसा फरक नव्हता. इटालियन सिनेमा, फ्रेंच न्यू वेव्ह, रशियन आणि जर्मन वेव्ह यांनी जागतिक चित्रपट संस्कृती समृद्ध केली. मात्र अमेरिकन पॉप संस्कृती, व्हिडिओ माध्यमे आणि मॉलमधील चित्रपटगृहांमुळे एकत्र चित्रपट पाहण्याचा सांस्कृतिक अनुभव मागे पडला.

भारतीय प्रेक्षकांविषयी बोलताना राडोवानोविच म्हणाले, “भारतीय प्रेक्षक अत्यंत शिक्षित आणि संवेदनशील आहेत. ‘कोर्ट’सारखा भारतीय चित्रपट युरोपमध्ये मोठ्या प्रमाणावर गाजला असून अनेक छोट्या चित्रपट महोत्सवांमध्ये तो यशस्वीपणे प्रदर्शित झाला आहे.”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Call Now Button