
छत्रपती संभाजीनगर, दि. १८ : भारतीय चित्रपटसंगीताला जागतिक ओळख मिळवून देणारे ज्येष्ठ संगीतकार आणि पद्मविभूषण सन्मानित इलयाराजा यांना यंदाचा प्रतिष्ठेचा पद्मपाणि पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. हा पुरस्कार अकराव्या अजिंठा वेरूळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात मान्यवरांच्या हस्ते प्रदान केला जाणार आहे.
बुधवार, दि. २८ जानेवारी ते रविवार, दि. १ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत छत्रपती संभाजीनगर येथे होणाऱ्या या महोत्सवाची अधिकृत घोषणा करण्यात आली. भारतीय सिनेसृष्टीतील अतुलनीय योगदानाबद्दल दिला जाणारा पद्मपाणि पुरस्कार यंदा इलयाराजा यांना देण्यात येणार असल्याची माहिती महोत्सवाचे संस्थापक व संयोजन समितीचे अध्यक्ष नंदकिशोर कागलीवाल, प्रमुख मार्गदर्शक अंकुशराव कदम आणि मानद अध्यक्ष आशुतोष गोवारीकर यांनी दिली.
पद्मपाणि पुरस्कार निवड समितीच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ समीक्षक लतिका पाडगांवकर होत्या, तर सदस्य म्हणून दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर, सुनील सुकथनकर आणि चंद्रकांत कुलकर्णी यांचा समावेश होता. पुरस्काराचे स्वरूप पद्मपाणि सन्मानचिन्ह, सन्मानपत्र आणि दोन लाख रुपये असे आहे.

हा पुरस्कार वितरण सोहळा बुधवार, दि. २८ जानेवारी २०२६ रोजी सायंकाळी ५.३० वाजता, रुक्मिणी सभागृह, एमजीएम परिसर, छत्रपती संभाजीनगर येथे महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी पार पडणार आहे. त्यानंतर महोत्सवातील चित्रपटांचे सादरीकरण पुढील पाच दिवस आयनॉक्स, प्रोझोन मॉल येथे होणार आहे.
गेल्या पाच दशकांहून अधिक काळ इलयाराजा यांनी भारतीय चित्रपटसंगीतात अमूल्य योगदान दिले आहे. त्यांनी आजवर ७,००० हून अधिक गाणी आणि १,५०० पेक्षा अधिक चित्रपटांसाठी संगीत रचना केली आहे. तामिळ, तेलुगू, मल्याळम, कन्नड, हिंदी, मराठी अशा विविध भाषांमधील त्यांच्या संगीतरचना रसिकांच्या मनात अढळ स्थान निर्माण करतात.
कर्नाटकी व हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत, लोकसंगीत आणि पाश्चात्त्य सिम्फनीची शिस्त यांचा सुरेख संगम हे त्यांच्या संगीताचे वैशिष्ट्य आहे. चित्रपटातील भावनांना गहिरी खोली देणारे पार्श्वसंगीत आणि कथानकाला पूरक ठरणारी रचना हीच त्यांची खरी ओळख ठरली आहे. याच आध्यात्मिकता, शिस्त आणि मानवी संवेदनशीलतेमुळे इलयाराजा यांना ‘इसैग्नानी’ अशी उपाधी लाभली आहे.
नाथ ग्रुप, एमजीएम विद्यापीठ आणि यशवंतराव चव्हाण सेंटर प्रस्तुत, तसेच मराठवाडा आर्ट कल्चर व फिल्म फाउंडेशन आयोजित हा महोत्सव केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालय, भारत सरकार आणि सांस्कृतिक कार्य विभाग, महाराष्ट्र शासन यांच्या सहकार्याने होत असून एनएफडीसी आणि महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी व सांस्कृतिक विकास महामंडळ यांची सहप्रस्तुती लाभली आहे. प्रोझोन मॉल यांचे विशेष सहकार्य या महोत्सवाला मिळाले आहे.
मराठवाड्याचे नाव जागतिक चित्रपट क्षेत्रात उज्ज्वल करणाऱ्या या महोत्सवात देशभरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन संयोजन समितीच्या वतीने करण्यात आले आहे.