वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम 2026 साठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दावोसकडे रवाना; ‘मॅग्नेटिक महाराष्ट्र’चा जागतिक गजर

मुंबई, दि. 19: महाराष्ट्राला 1 ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेकडे नेण्याच्या दिशेने वेग अधिक वाढवण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम (WEF) 2026 मध्ये सहभागी होण्यासाठी स्वित्झर्लंडमधील दावोसकडे रवाना झाले आहेत. या महत्त्वपूर्ण आंतरराष्ट्रीय परिषदेसाठी उद्योग मंत्री डॉ. उदय सामंत तसेच प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासमवेत आहेत.

जागतिक व्यासपीठावर भारताच्या विकास इंजिन म्हणून ‘मॅग्नेटिक महाराष्ट्र’ अधिक बळकट करण्याचा राज्य शासनाचा निर्धार असून, महाराष्ट्राच्या नव्या ‘महा-ग्रोथ’ गाथेकडे संपूर्ण जगाचे लक्ष वेधले गेले आहे. वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम 2026 महाराष्ट्राच्या 1 ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेच्या लक्ष्याकडे वाटचाल वेगवान करण्यात निर्णायक ठरेल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.

गेल्या वर्षी महाराष्ट्राने सुमारे 16 लाख कोटी रुपयांचे गुंतवणूक करार केले होते. यावर्षी त्याहून अधिक गुंतवणूक आकर्षित करण्याचे उद्दिष्ट राज्य शासनाने निश्चित केले आहे.

दावोस येथे होणाऱ्या या परिषदेदरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जागतिक उद्योगसमूह, बहुराष्ट्रीय कंपन्यांचे प्रमुख, गुंतवणूकदार आणि धोरणकर्त्यांशी थेट चर्चा करणार आहेत. महाराष्ट्रात थेट विदेशी गुंतवणूक (FDI), नवीन औद्योगिक प्रकल्प, मोठ्या प्रमाणावर रोजगारनिर्मिती आणि सर्वांगीण आर्थिक विकासाला चालना देणे, हा या दौऱ्याचा मुख्य उद्देश असल्याचेही सांगण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Call Now Button