
पुणे, दि. 18 : जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व लोकसेवा इंग्लिश मीडियम स्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने राज्य क्रीडा दिनानिमित्त ऑलिम्पिकवीर खाशाबा जाधव यांना १०१ चित्रांच्या माध्यमातून अनोखी मानवंदना देण्यात आली. पाषाण येथील लोकसेवा ई-स्कूलमध्ये खाशाबा जाधव यांच्या १०१ व्या जयंतीनिमित्त १०१ विद्यार्थिनींनी एकाच वेळी त्यांची १०१ चित्रे रेखाटून हा उपक्रम साकारला.
या कार्यक्रमास पॅरा ऑलिम्पिक रौप्यपदक विजेता सचिन खिलारी, लोकसेवा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष दीपक पायगुडे, लेखक प्रा. संजय दुधाणे, जिल्हा क्रीडा अधिकारी जगन्नाथ लकडे, प्राचार्य पी. एच. षाफीमोन, क्रीडा अधिकारी दादासाहेब देवकाते आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात विद्यार्थ्यांनी साकारलेल्या खाशाबा जाधव यांच्या रंगीत तैलचित्राच्या पूजनाने करण्यात आली. उत्कृष्ट चित्र साकारणाऱ्या १० विद्यार्थिनींना स्मृतिचिन्ह देऊन गौरवण्यात आले, तर सर्व १०१ बाल चित्रकारांना खाशाबा जाधव यांचे चरित्र पुस्तक भेट देण्यात आले. हा गौरव सोहळा सचिन खिलारी यांच्या हस्ते पार पडला. कला शिक्षिका शंकर साळुंखे, शुभांगी कुलकर्णी, स्वाती पवार आणि शीतल लाडवते यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
यावेळी बोलताना सचिन खिलारी म्हणाले, “खाशाबा जाधव हे माझ्यासाठी आदर्श आहेत. पदक मिळाल्यानंतर त्यांना चार वर्षांनी शासकीय नोकरी मिळाली, तर मला पदक जिंकताच चार दिवसांत नोकरी मिळाली. शासनाच्या क्रीडा सुविधांमुळे महाराष्ट्रात आज खाशाबांसारखे खेळाडू घडत आहेत. प्रबळ इच्छाशक्ती आणि अथक मेहनत असेल तर भारताला ऑलिम्पिकमध्ये निश्चितच पदके मिळतील.”
खाशाबा जाधव यांच्या हेलसिंकी ऑलिम्पिकमधील संघर्षाची गाथा सांगताना प्रा. संजय दुधाणे म्हणाले की, “खाशाबांची जडणघडण शालेय जीवनातच झाली. खेळाडूंना प्रोत्साहन देणाऱ्या शाळेत त्यांच्या प्रतिमांना चित्ररूपात मानवंदना देणे हा अत्यंत प्रेरणादायी उपक्रम आहे.”
जिल्हा क्रीडा अधिकारी जगन्नाथ लकडे यांनी शासनाच्या क्रीडा योजनांची माहिती देत सांगितले की, “खाशाबा जाधव यांचा जन्मदिन राज्य क्रीडा दिन म्हणून साजरा होत असताना विद्यार्थ्यांनी चित्रांच्या माध्यमातून त्यांच्या कार्याला दिलेली सलामी कौतुकास्पद आहे. शतकोत्तर जयंतीनिमित्त पुण्यात हा उपक्रम विशेष ठरतो.”
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दीपाली गजभिये यांनी केले, तर आभार प्रदर्शन दादासाहेब देवकाते यांनी केले.