
पुणे, दि. 18 : बजाज पुणे ग्रँड टूर २०२६ ही केवळ आंतरराष्ट्रीय सायकल स्पर्धा म्हणून मर्यादित न राहता पुढील अनेक पिढ्यांसाठी टिकणारा क्रीडा, पर्यटन आणि पायाभूत वारसा ठरणार असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. पुण्यातील जेडब्ल्यू मेरियट हॉटेल येथे आयोजित आंतरराष्ट्रीय बजाज पुणे ग्रँड टूर २०२६ च्या भव्य शुभारंभ आणि जगभरातून आलेल्या सायकलपटूंच्या स्वागतप्रसंगी ते बोलत होते.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, पुणे जिल्हा हा इतिहास, संस्कृती आणि आधुनिकतेचा संगम आहे. येथे प्रत्येक किलोमीटरवर शौर्य, परंपरा आणि संस्कृतीच्या कथा अनुभवायला मिळतात. सांस्कृतिक राजधानी असलेल्या पुण्याने तंत्रज्ञान, मॅन्युफॅक्चरिंग आणि आयटी क्षेत्रातही आघाडी घेतली असून, पश्चिम घाटाच्या निसर्गसौंदर्यामुळे या आंतरराष्ट्रीय सायकल स्पर्धेला अनोखे वैशिष्ट्य लाभले आहे. बजाज पुणे ग्रँड टूर २०२६ ही स्पर्धा लवकरच जागतिक क्रीडा कॅलेंडरमधील प्रतिष्ठेची वार्षिक स्पर्धा बनेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
ही स्पर्धा भविष्यातील अनेक शतकांसाठी टिकणाऱ्या मार्गाची सुरुवात असल्याचे नमूद करत मुख्यमंत्री म्हणाले की, स्पर्धेसोबत विविध पूरक उपक्रम राबवण्यात येणार असून, पर्यटकांना निसर्गासोबतच छत्रपती शिवाजी महाराजांच्या ऐतिहासिक किल्ल्यांचे दर्शन घेण्याची संधी मिळणार आहे. ‘यूसीआय’च्या इतिहासात मैलाचा दगड ठरेल अशी ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी महाराष्ट्र शासन सर्वतोपरी सहकार्य करेल, अशी ग्वाही त्यांनी दिली.
जगभरातील किमान ३५ देशांमधून आलेल्या आंतरराष्ट्रीय सायकलपटू, प्रशिक्षक, व्यवस्थापक आणि सहकारी अधिकाऱ्यांचे महाराष्ट्र शासनाच्यावतीने स्वागत करताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी पुणे जिल्हा प्रशासन व सर्व शासकीय यंत्रणांचे विशेष अभिनंदन केले. अत्यंत कमी कालावधीत आंतरराष्ट्रीय मानकांनुसार स्पर्धेची तयारी पूर्ण करण्यात आली असून, ४३७ किलोमीटर लांबीचे रस्ते जागतिक दर्जाच्या सायकलिंग स्पर्धेस अनुरूप विकसित करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. कामाच्या अंमलबजावणीचा हा वेग अभूतपूर्व असून, गेल्या तीन दशकांतील प्रशासनातील अनुभवात पाहिलेला हा सर्वोच्च वेग असल्याचे त्यांनी नमूद केले.
कार्यक्रमात केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील, सामाजिक न्याय राज्यमंत्री माधुरी मिसाळ, सायकलिंग फेडरेशन ऑफ इंडियाचे महासचिव दातो मनिंदर पाल सिंग यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
भारतीय पोशाखाचा जागतिक गौरव
या वेळी आंतरराष्ट्रीय सायकलपटू कुर्ता, पायजमा व जॅकेट अशा पारंपरिक भारतीय पोशाखात मंचावर उपस्थित राहिले होते. विविध देश, भाषा आणि संस्कृतींचे प्रतिनिधित्व करणारे खेळाडू एकाच पारंपरिक वेशात दिसल्याने “वसुधैव कुटुंबकम्” या भारतीय विचारधारेचे जिवंत दर्शन घडले. खेळाच्या माध्यमातून संस्कृतींची सांगड घालणारा हा क्षण उपस्थितांसह जागतिक प्रेक्षकांसाठीही स्मरणीय ठरला.