सफाई कामगाराचा मुलगा ते पुणे महापालिकेचा नगरसेवक : अमर आवळेंचा प्रेरणादायी राजकीय प्रवास

पुणे : पुणे महानगरपालिकेच्या जानेवारी २०२६ मध्ये झालेल्या निवडणुकीत प्रभाग क्रमांक २७ (साने गुरुजी नगर – नवी पेठ – पर्वती) येथून भारतीय जनता पक्षाच्या वतीने विजय मिळवलेले अमर आवळे यांचा प्रवास संपूर्ण पुण्यासाठी प्रेरणादायी ठरत आहे. सफाई कामगार म्हणून आयुष्यभर कष्ट करणाऱ्या आई-वडिलांचा मुलगा आज पुणे महापालिकेचा नगरसेवक झाला असून, हा विजय केवळ राजकीय नसून सामाजिक परिवर्तनाचे प्रतीक मानला जात आहे.

अमर आवळे (पूर्ण नाव : महेश उर्फ अमर विलास आवळे) यांचे आई-वडील गेल्या २५ वर्षांपासून पुणे महानगरपालिकेत सफाई कामगार म्हणून कार्यरत आहेत. शहर स्वच्छ ठेवण्यासाठी रस्त्यावर उतरून काम करणाऱ्या या कुटुंबातून पुढे आलेल्या अमर यांनी शिक्षण, समाजकार्य आणि संघटनात्मक कामाच्या जोरावर आपला स्वतंत्र ठसा उमटवला.

एका सामान्य कष्टकरी वसाहतीतून राजकारणात प्रवेश करत त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून निवडणूक लढवली आणि मतदारांचा विश्वास संपादन करत दणदणीत विजय मिळवला. विशेष म्हणजे, ज्या महापालिकेत त्यांच्या आई-वडिलांनी वर्षानुवर्षे सेवा दिली, त्याच पालिकेत आता त्यांचा मुलगा धोरण ठरवणाऱ्या भूमिकेत असणार आहे, ही बाब अनेकांसाठी भावूक करणारी ठरली आहे.

विजयानंतर अमर आवळे यांनी भाजप शहराध्यक्ष धीरज घाटे यांची भेट घेऊन आनंद व्यक्त केला. “हा विजय माझा वैयक्तिक नसून माझ्या आई-वडिलांच्या कष्टांचा आणि सामान्य कार्यकर्त्यांच्या संघर्षाचा आहे,” अशी भावना त्यांनी व्यक्त केली.

अमर आवळेंचा हा राजकीय प्रवास जिद्द, चिकाटी आणि योग्य संधी मिळाल्यास सामान्य कुटुंबातील तरुणही नेतृत्व करू शकतो, याचा ठोस संदेश देणारा आहे. त्यामुळे त्यांच्या विजयाकडे पुण्याच्या राजकारणातील महत्त्वाचा सामाजिक टप्पा म्हणून पाहिले जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Call Now Button