राघवेंद्र बाप्पू मानकर महाराष्ट्रात सर्वाधिक मताधिक्याने विजयी; २६,४९७ मतांचा विक्रम

पुणे, दि.17:पुण्यासह राज्यातील २८ महानगरपालिकांच्या निवडणुकांचे निकाल शुक्रवारी जाहीर झाले असून, या निवडणुकीत पुणे महापालिकेतील प्रभाग क्रमांक २५-ब येथून भारतीय जनता पक्षाचे उमेदवार राघवेंद्र बाप्पू मानकर यांनी तब्बल २६ हजार ४९७ मतांच्या विक्रमी फरकाने विजय मिळवत राज्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे.

राज्यातील महापालिका निवडणुकांच्या निकालानंतर भाजपाने जोरदार मुसंडी मारल्याचे चित्र दिसून आले आहे. पुणे महानगरपालिकेत भाजपाला १२० हून अधिक जागांवर विजय मिळाला आहे. प्रभाग क्रमांक २५ मधील चारही जागांवर भाजपाचे उमेदवार — राघवेंद्र बाप्पू मानकर, स्वरदा बापट, कुणाल टिळक आणि स्वप्नाली पंडित — मोठ्या मताधिक्याने विजयी झाले आहेत.

राघवेंद्र बाप्पू मानकर यांनी आपल्या पहिल्याच निवडणुकीत राज्यभरात सर्वाधिक मताधिक्य मिळवण्याची उल्लेखनीय कामगिरी केली आहे. प्रभाग क्रमांक २५ मध्ये झालेल्या एकूण मतदानापैकी ३१ हजार ९८१ मते त्यांना मिळाली असून, हे प्रमाण तब्बल ७९.३४ टक्के इतके आहे.

दरम्यान, पुणे महापालिकेतीलच प्रभाग ३२-ब मधून भारतभूषण बराटे यांनी २५ हजारांचे, तर प्रभाग ४-ब मधून रत्नमाला सातव यांनी २३ हजारांचे मताधिक्य मिळवले आहे. मुंबई महापालिकेत भाजपाचे निल सोमय्या यांनी १५ हजार मतांच्या फरकाने प्रथम क्रमांक मिळवला असून, पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेत नितीन निकाळजे हे सर्वाधिक मताधिक्याने विजयी ठरले आहेत.

विजयानंतर प्रतिक्रिया देताना राघवेंद्र बाप्पू मानकर म्हणाले,
“माझ्या प्रभागातील ज्येष्ठ कार्यकर्त्यांनी उभे केलेले मजबूत संघटन, पदाधिकाऱ्यांचे अथक परिश्रम, मित्र-परिवाराने प्रचारात दिलेले योगदान आणि नागरिकांसाठी सातत्याने केलेल्या कामांचा हा परिपाक आहे. प्रभागातील सर्व नागरिकांनी दिलेल्या या मतरूपी आशीर्वादाबद्दल मी मनःपूर्वक आभार मानतो. राज्यात सर्वाधिक मताधिक्य हा केवळ निकाल असून, माझा खरा भर प्रभागाला पुण्यासह राज्यात सर्वाधिक विकसित करण्यावर असेल.”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Call Now Button