हा विजय जनतेला समर्पित : प्रभाग ९ मधून अमोल बालवडकरांचा दणदणीत विजय

पुणे, दि.17 : प्रभाग क्रमांक ९ मधून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे उमेदवार अमोल बालवडकर यांनी महानगरपालिका निवडणुकीत दणदणीत विजय मिळवला. विजयानंतर प्रतिक्रिया देताना त्यांनी, “हा विजय माझा नसून प्रभागातील जनतेचा आहे. हा विजय मी संपूर्ण जनतेला समर्पित करतो,” असे स्पष्ट शब्दांत सांगितले.

अमोल बालवडकर म्हणाले की, गेल्या अनेक वर्षांपासून प्रभागातील नागरिकांच्या विविध प्रश्नांवर सातत्याने काम करण्यात आले. रस्ते, पाणीपुरवठा, वाहतूक व्यवस्थापन, स्वच्छता तसेच नागरिकांच्या दैनंदिन अडचणी सोडवण्यासाठी आपण आणि आपली टीम प्रत्यक्ष रस्त्यावर उतरून काम करत राहिलो. “काम केल्यामुळेच जनतेने माझ्यावर विश्वास ठेवला आणि निवडणुकीत ठाम पाठिंबा दिला,” असेही त्यांनी नमूद केले.

या निवडणुकीत पुण्यातील दोन मंत्र्यांनी सर्व ताकद पणाला लावूनही जनतेने कामालाच मत दिल्याचे बालवडकर यांनी सांगितले. “काही नेत्यांनी माझा पराभव करण्यासाठी सर्वस्व पणाला लावले, मात्र शेवटी विजय हा सत्याचाच होतो. जनतेचा विश्वास आणि सत्याची बाजू मजबूत असेल, तर कोणतीही ताकद विजय रोखू शकत नाही,” असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला.

पुढील काळात विकासकामांना अधिक गती देण्याचा निर्धार व्यक्त करताना अमोल बालवडकर म्हणाले, “हा विजय केवळ निवडणुकीतील यश नसून जनतेच्या अपेक्षांना न्याय देण्याची मोठी जबाबदारी आहे. प्रभाग ९ ला ‘मॉडेल प्रभाग’ बनवण्यासाठी अधिक जोमाने काम करू.”

या विजयानंतर प्रभागातील नागरिक, कार्यकर्ते आणि समर्थकांनी मोठ्या उत्साहात आनंद व्यक्त करत विजयोत्सव साजरा केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Call Now Button