‘माझं घर तोडणाऱ्यांना जनतेने धडा शिकवला’; BMC पराभवानंतर कंगना राणौतची उद्धव ठाकरेंवर तिखट टीका

पुणे, दि.17:  मुंबई महानगरपालिका (BMC) निवडणूक २०२६ मध्ये उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेला मोठा धक्का बसल्यानंतर अभिनेत्री आणि भाजप खासदार कंगना राणौत हिने अत्यंत तिखट आणि जळजळीत प्रतिक्रिया दिली आहे. २०२० साली मुंबई महापालिकेने तिच्या वांद्रे येथील कार्यालयावर केलेल्या कारवाईचा संदर्भ देत कंगनाने या निकालाला ‘न्यायाचा क्षण’ असे संबोधले आहे.

कंगना म्हणाली, “ज्यांनी मला शिव्या दिल्या, माझं घर पाडलं आणि मला महाराष्ट्र सोडण्याची धमकी दिली, आज महाराष्ट्रानेच त्यांना सोडून दिलं आहे. जनतेने माझं घर तोडणाऱ्यांना योग्य धडा शिकवला आहे.”

२०२० मध्ये उद्धव ठाकरेंना उद्देशून केलेले तिचे विधान — “आज माझं घर तुटलंय, उद्या तुझं घमंड तुटेल” — हे विधान उद्धव ठाकरे यांच्या पराभवानंतर पुन्हा एकदा सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे.

कंगनाने आपल्या प्रतिक्रियेत शिवसेनेवर जोरदार टीका करत ‘महिला-द्वेष्टे, गुंड आणि नेपोटिझम माफिया’ यांना जनतेने त्यांची योग्य जागा दाखवून दिल्याचा दावा केला.
तसेच या विजयाबद्दल तिने पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप कार्यकर्त्यांचे अभिनंदन करत याला ‘भगवी लाट’ असे संबोधले.

मुंबई महापालिकेवर गेल्या अनेक दशकांपासून असलेल्या शिवसेनेच्या सत्तेला या निकालाने मोठा सुरुंग लागला असून, भाजप व महायुतीने ऐतिहासिक मुसंडी मारल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Call Now Button