
पुणे, दि.17: पुणे जिल्हा प्रशासनाच्या विद्यमाने आणि सायकलिंग फेडरेशन ऑफ इंडिया यांच्या सहकार्याने आयोजित “पुणे ग्रॅड चॅलेंज टूर २०२६” या आंतरराष्ट्रीय सायकल स्पर्धेच्या टप्पा क्रमांक तीन निमित्त २२ जानेवारी २०२६ रोजी सकाळी ८ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत सासवड, जेजुरी, वडगाव निंबाळकर, सुपा, माळेगाव व बारामती तालुका तसेच बारामती शहर हद्दीत व्यापक वाहतूक बदल लागू करण्यात आले आहेत.
या टप्प्यात सुमारे १३७ किलोमीटर अंतराचा मार्ग समाविष्ट असून स्पर्धा सुरक्षित आणि सुरळीत पार पडण्यासाठी जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी जितेंद्र डुडी यांनी वाहतूक बंद व पर्यायी मार्गाने वळविण्याचे आदेश जारी केले आहेत.
स्पर्धेदरम्यान सासवड पोलीस स्टेशन हद्दीत हडपसर–सासवड–जेजुरी मार्ग, सासवड–कापूरहोळ मार्ग तसेच सासवड शहरातून जाणारी वाहतूक विविध बायपास व पर्यायी मार्गांनी वळविण्यात येणार आहे. काही घाटमार्गांवरील वाहतूक पूर्णतः बंद राहणार आहे.
जेजुरी, वडगाव निंबाळकर, सुपा व बारामती तालुका पोलीस स्टेशन हद्दीतही प्रमुख राज्य व जिल्हा मार्गांवरील वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्यात येणार असून अनेक चौक, फाटे व पालखी महामार्गावरील काही ठिकाणी वाहतूक पूर्णतः बंद ठेवण्यात येणार आहे.
दरम्यान, २१ जानेवारी रोजी रात्री १० वाजल्यापासून २२ जानेवारी रोजी रात्री ८ वाजेपर्यंत सासवड नगरपरिषद परिसर, विद्या प्रतिष्ठान प्रशाला परिसर तसेच बारामती एमआयडीसी व शहर हद्दीत जड व अवजड वाहनांच्या प्रवेशास मनाई करण्यात आली आहे.
वाहनचालक व नागरिकांनी गैरसोय टाळण्यासाठी प्रशासनाने सूचित केलेल्या पर्यायी मार्गांचा वापर करावा व पोलीस प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.