
पुणे, दि. 17 : “आम्ही काही मित्रांनी मिळून पैसे गोळा केले. ही मोठी रिस्क होती, पण आमची जिद्द पक्की होती आणि त्यातून ‘कडकनाथ’ हा चित्रपट तयार झाला,” असे मत ‘कडकनाथ’ चित्रपटाचे दिग्दर्शक कौशिक गरासिया यांनी व्यक्त केले. पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (पिफ) भारतीय चित्रपट विभागात ‘कडकनाथ’चे प्रदर्शन झाल्यानंतर ते बोलत होते.
‘कडकनाथ’ हा ‘भिल’ या आदिवासी बोलीभाषेत तयार झालेला भारतातील पहिलाच मोठा चित्रपट असल्याचे गरासिया यांनी सांगितले. अत्यंत कमी बजेटमध्ये तांत्रिक दर्जा टिकवणे हे मोठे आव्हान होते. मात्र मित्रांची साथ आणि भिल भाषेला जागतिक स्तरावर ओळख मिळवून देण्याची जिद्द यातून हा चित्रपट साकार झाला. भिल भाषा अनेक प्रदेशांत बोलली जात असली तरी तिला अपेक्षित महत्त्व मिळालेले नाही. अनेकांना ही स्वतंत्र भाषा आहे, याची जाणीवही नाही. त्यामुळेच या भाषेत चित्रपट बनवण्याचा निर्णय घेतल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
चित्रपटाची कथा गुजरातच्या दुर्गम आदिवासी भागात घडते. रहस्यमय मृत्यू, नरबळी आणि जातीय अत्याचार या पार्श्वभूमीवर उलगडणारा हा रहस्यपट असून, भिल संस्कृती आणि जीवनशैली पुढे आणण्याचा प्रयत्न त्यातून करण्यात आला आहे.
दरम्यान, ‘इम्बू’ हा तुळू भाषेतील चित्रपटही पिफमध्ये प्रदर्शित झाला. दिग्दर्शक शिवध्वज शेट्टी यांनी सांगितले की, श्रद्धा, परंपरा, दैवी शक्ती, नृत्य आणि संगीत यांच्या सांस्कृतिक प्रवाहात आधुनिक तंत्रज्ञान—विशेषतः मोबाईल फोन—मानवी जीवनावर कसा परिणाम करतो, याचे प्रभावी चित्रण या चित्रपटात आहे. मोबाईलच्या अतिवापरामुळे कौटुंबिक नातेसंबंध, मानसिक समतोल कसा ढासळतो आणि माणूस कृत्रिम जगात अडकून वास्तविक आयुष्य कसे गमावतो, हे ‘इम्बू’मधून मांडण्यात आले आहे. ‘इम्बू’ म्हणजे आशीर्वाद; श्रद्धा आणि डिजिटल जगातील संघर्ष हा चित्रपटाचा केंद्रबिंदू आहे.
तसेच, महिला स्वातंत्र्याभोवती फिरणारा मल्याळी चित्रपट ‘व्हिक्टोरिया’ही प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत आहे. दिग्दर्शिका शिवरंजिनी जे यांनी सांगितले की, एका दिवसासाठी धार्मिक विधीचा कोंबडा सांभाळणाऱ्या युवतीच्या माध्यमातून स्त्रीचे स्वातंत्र्य, तिचे अस्तित्व आणि आंतरधार्मिक नात्यांचा संघर्ष या चित्रपटात अधोरेखित करण्यात आला आहे. केरळ राज्य चित्रपट विकास महामंडळाच्या निर्मिती अनुदानामुळे हा चित्रपट शक्य झाला, असेही त्यांनी नमूद केले.