
पुणे, दि. 16: पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत भारतीय जनता पार्टीने दणदणीत विजय मिळवत शहरावर आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. जाहीर झालेल्या निकालांनुसार भाजपाला 128 पैकी 85 जागांवर विजय मिळाला असून, भाजपाचा एकहाती महापौर बसवण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या ऐतिहासिक विजयावर प्रतिक्रिया देताना भाजपा नेते तथा आमदार महेश लांडगे यांनी हा महाविजय स्वाभिमानी पिंपरी-चिंचवडकरांना समर्पित असल्याचे सांगितले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सक्षम नेतृत्वावर आणि पक्षश्रेष्ठींच्या मार्गदर्शनावर जनतेने पुन्हा एकदा ठाम विश्वास व्यक्त केल्याचे त्यांनी नमूद केले. महानगरपालिका निवडणूक 2026 च्या पार्श्वभूमीवर शहरात तीव्र राजकीय वातावरण निर्माण झाले होते. जोरदार प्रचार, घराघरात पोहोचलेला संवाद आणि विकासाच्या मुद्द्यांवर केंद्रित केलेल्या लढतीमुळे भाजपाच्या बाजूने स्पष्ट जनमत तयार झाल्याचे निकालातून दिसून येत आहे. या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला 36, शिवसेना (शिंदे गट) 6 तर अपक्षांना 1 जागा मिळाली आहे. भाजप व शिंदे गट युती मिळून महायुतीकडे एकूण 91 जागा गेल्या असून, स्थिर आणि भक्कम सत्ता प्रस्थापित झाली आहे. आमदार महेश लांडगे म्हणाले, “पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या विकासाभिमुख नेतृत्वावर विश्वास ठेवत पिंपरी-चिंचवडकरांनी भाजपाला निर्णायक कौल दिला आहे. हा विजय केवळ पक्षाचा नसून, शहरातील प्रत्येक स्वाभिमानी नागरिकाचा आहे.” या यशामागे भाजप शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे, निवडणूक प्रमुख आमदार शंकर जगताप, आमदार उमा खापरे, आमदार अमित गोरखे तसेच सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते आणि संघटनांचा मोलाचा वाटा असल्याचे त्यांनी सांगितले. कार्यकर्त्यांचे मानले आभार घराघरात जाऊन केलेला संवाद, संघटनात्मक ताकद आणि कार्यकर्त्यांची प्रामाणिक मेहनत यामुळेच हा विजय शक्य झाला असल्याचे सांगत आमदार लांडगे यांनी सर्व कार्यकर्त्यांचे आभार मानले. पिंपरी-चिंचवडच्या सर्वांगीण, नियोजित आणि शाश्वत विकासासाठी भाजप कटिबद्ध असून, महानगरपालिकेच्या माध्यमातून विकासकामांना अधिक गती देण्याचा संकल्प त्यांनी व्यक्त केला. प्रतिक्रिया : “विकासाभिमुख हिंदुत्वाच्या मुद्द्यावर आम्ही ही निवडणूक लढवली. विरोधकांच्या बिनबुडाच्या आरोपांना जनतेने चोख प्रत्युत्तर दिले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली शहराच्या शाश्वत विकासासाठी आम्ही एकजुटीने काम करू. नवनिर्वाचित सर्व नगरसेवकांचे मनःपूर्वक अभिनंदन करतो.” – महेश लांडगे, आमदार, भाजपा, पिंपरी-चिंचवड