
पुणे दि. 16 : “समृद्ध संस्कृती, ऐतिहासिक वारसा आणि निसर्गनिर्मित अद्भुत ठिकाणी फिरण्याचा अनुभव मनाला सुखदायी असतो. प्रवासातील अनुभव आत्मविश्वास आणि सहनशीलता वाढवतात. ठरलेली, साचेबद्ध पर्यटनस्थळे पाहण्याबरोबरच ऑफबीट ठिकाणे, इतिहास आणि स्थानिक संस्कृती जाणून घेणे महत्त्वाचे आहे,” असे मत प्रसिद्ध गायिका व सोलो ट्रॅव्हलर डॉ. राधा मंगेशकर यांनी व्यक्त केले.भारतीय पर्यटन विकास सहकारी संस्थेच्या वतीने आयोजित गेट सेट गो हॉलिडेज व सचिन इंटरनॅशनल प्रस्तुत तीन दिवसीय सहावा पुणे पर्यटन महोत्सव शुक्रवारी शिवाजीनगर येथील हॉटेल सेंट्रल पार्कमध्ये उद्घाटित झाला. या वेळी गायिका मनीषा निश्चल, संस्थेचे अध्यक्ष प्रवीण घोरपडे, सचिव प्रथमेश कुलकर्णी यांच्यासह पर्यटन क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.डॉ. मंगेशकर पुढे म्हणाल्या, “एकटीने प्रवास सुरू केल्यावर निर्णयक्षमता वाढते, भीती नष्ट होते आणि आत्मविश्वास बळकट होतो. सुंदर ठिकाणे, वास्तू आणि कलाकृती पाहताना स्वतःचे स्वतंत्र विचार उमटतात. त्यामुळे व्यक्तिमत्त्वाचा सर्वांगीण विकास होतो.” पर्यटनवाढीसाठी अशा महोत्सवांचे महत्त्व अधोरेखित करत त्यांनी आयोजकांचे कौतुक केले.या महोत्सवात महाराष्ट्रासह देश-विदेशातील पर्यटनस्थळे, गड-किल्ले, ऐतिहासिक व दुर्लक्षित ठिकाणांची माहिती देण्यात येत आहे. सुमारे ७० पर्यटन कंपन्यांचे स्टॉल्स येथे उपलब्ध असून, पुणेकरांसाठी हा महोत्सव रविवार, दि. १८ जानेवारीपर्यंत विनामूल्य खुला आहे, अशी माहिती प्रवीण घोरपडे यांनी दिली.महोत्सवाअंतर्गत शनिवारी कैलास मानसरोवर यात्रा माहिती सत्र, जंगल पर्यटन मार्गदर्शन सत्र तर रविवारी “कॉर्पोरेट ट्रॅव्हलचे नवे रूप: २०२६ मध्ये पर्सनलायझेशन, टेक्नॉलॉजी आणि कर्मचारी समाधान” या विषयावर विशेष मार्गदर्शन सत्र होणार आहे. प्रथमेश कुलकर्णी यांनी प्रास्ताविक केले, सारंग भिडे यांनी सूत्रसंचालन तर संतोष माने यांनी आभार मानले.