
पुणे दि. 16 :पुणे महानगरपालिका निवडणुकीतील निकाल हे पूर्णतः अनपेक्षित असून, आजवर केलेली विकासकामे हरली आणि पैसा जिंकला, अशा शब्दांत शिवसेनेचे माजी उपमहापौर व प्रभाग क्रमांक ३६ (ड) सहकारनगर–पद्मावतीचे अधिकृत उमेदवार आबा बागुल यांनी आपल्या पराभवाबद्दल तीव्र खंत व्यक्त केली आहे.धक्कादायक पराभवानंतर प्रतिक्रिया देताना आबा बागुल म्हणाले की, लोकशाही व्यवस्थेवरील नागरिकांचा विश्वास कमी होत चालल्याचे या निवडणुकीतून पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. निवडणूक जाहीर झाल्यापासून मतदानाच्या दिवसापर्यंत सर्वत्र गोंधळ, तणाव, पैशाचा खुलेआम वापर आणि सत्तेचा गैरवापर पाहायला मिळाला. सुज्ञ मतदार या प्रकारांना आळा घालतील, अशी अपेक्षा होती; मात्र अखेरीस पैसा जास्त प्रभावी ठरला, अशी खंत त्यांनी व्यक्त केली.“मी सलग सहा वेळा निवडून आलो आहे. वॉर्ड बदलले, प्रभाग रचना बदलली, तरीही मी केवळ विकासकामांच्या जोरावर निवडून आलो. मात्र यंदा सातव्यांदा निवडणुकीला सामोरे जाताना जो पराभव स्वीकारावा लागला, तो पूर्णतः अनपेक्षित आहे,” असे बागुल म्हणाले.सत्ताधाऱ्यांकडून कोणत्याही प्रकारचे षडयंत्र रचले जाऊ शकते, यावरच या निकालाने शिक्कामोर्तब झाल्याचा आरोप त्यांनी केला. यंत्रणांचा गैरवापर करून, मोठ्या प्रमाणावर पैशाचा पाऊस पाडत विकासकामांना दुय्यम स्थान देण्याची खेळी यशस्वी झाली, ही लोकशाहीच्या दृष्टीने अत्यंत दुर्दैवी बाब असल्याचे त्यांनी नमूद केले.आपल्या राजकीय प्रवासाचा उल्लेख करताना आबा बागुल म्हणाले की, अपक्ष म्हणून पहिली निवडणूक जिंकल्यानंतर त्यांनी सातत्याने विकासकामांवर भर दिला. मात्र यंदाचा पराभव हा अपेक्षित नसून, तरीही विकासकामांवर विश्वास ठेवून आपल्याला मतदान करणाऱ्या सुज्ञ मतदारांचे त्यांनी मनापासून आभार मानले.