
पुणे, दि. १६ जानेवारी २०२६ :पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (पिफ) २०२६ मध्ये यंदा महिला दिग्दर्शकांची लक्षणीय उपस्थिती पाहायला मिळत असून, एकूण १३० चित्रपटांपैकी तब्बल ४५ चित्रपट महिला दिग्दर्शकांचे आहेत. जागतिक चित्रपट स्पर्धा, ग्लोबल सिनेमा, भारतीय चित्रपट आणि माहितीपट अशा विविध विभागांमध्ये या चित्रपटांचा समावेश करण्यात आला आहे.जागतिक चित्रपट स्पर्धा विभागात सहा महिला दिग्दर्शिकांचे चित्रपट दाखवले जाणार आहेत. बेल्जियमच्या लॉरा वँडेल यांचा ‘अॅडम्स सेक’ किशोरवयीन मुलाच्या मानसिक गुंतागुंतीतून आई–मुलाच्या नात्याचा शोध घेतो. कॅनडाच्या सोफी रोमवारी यांचा ‘ब्लू हेरॉन’ स्थलांतराचा अनुभव मांडतो. फ्रान्सच्या पॉलीन लोक्वेस यांचा ‘निनो’ घशाच्या कर्करोगाशी झुंज देणाऱ्या तरुणाची कथा सांगतो. हंगेरीच्या इल्डिको एन्येदी यांचा ‘सायलेंट फ्रेंड’ तीन वेगवेगळ्या कालखंडांतील कथा एका झाडाभोवती गुंफतो, तर ऑस्ट्रियाच्या एल्सा क्रेम्सर यांचा ‘व्हाइट स्नेल’ मानवी नातेसंबंधांचा वेध घेतो. याशिवाय हदीह लैला ती दिग्दर्शित ‘धीस इज माय नाईट’ या चित्रपटाचाही समावेश आहे.ग्लोबल सिनेमा विभागात महिला दिग्दर्शिकांचे २९ चित्रपट निवडले गेले असून, ‘लूझ’, ‘पिंच’, ‘कारवाँ’, ‘नो वे बॅक’ आणि ‘साउंड ऑफ फॉलिंग’ यांसारखे चित्रपट सामाजिक तणाव, कौटुंबिक नाती, वास्तव घटना आणि वैयक्तिक स्वातंत्र्य यांवर प्रकाश टाकतात.आसामच्या दिग्दर्शिका मंजू बोरा यांचा भारत–इस्रायल सहनिर्मितीतील ‘मर्डर्स टू क्लोज – लव्ह टू फार’ हा चित्रपट प्रेम, हत्या आणि राजकीय संघर्ष यांवर आधारित असून, हा आसामी चित्रपटसृष्टीतील महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे.महाराष्ट्रातील दिग्दर्शिका ईशा पुंगलिया यांचा ‘ओस्लो : अ टेल ऑफ प्रॉमिस’ हा माहितीपट अभिनेता जॉन अब्राहम यांच्या निर्मितीत सादर होणार आहे. मराठी चित्रपट स्पर्धा विभागात जिजीविशा काळे दिग्दर्शित ‘मदरहूड – तिघी’ या चित्रपटाची निवड झाली आहे.“मराठी चित्रपटसृष्टीत महिलांची सर्जनशील उपस्थिती वाढणं गरजेचं आहे,” असे मत जिजीविशा काळे यांनी व्यक्त केले.

भारतीय चित्रपट विभागात शिवरंजिनी जे. यांचा मल्याळम चित्रपट ‘व्हिक्टोरिया’ तर तनुश्री दास सह-दिग्दर्शित ‘शॅडोबॉक्स’ हा बंगाली चित्रपटही दाखवण्यात येणार आहे.या सर्व चित्रपटांमुळे यंदाच्या पिफमध्ये महिला दिग्दर्शकांचे प्रभावी स्थान प्रकर्षाने अधोरेखित झाले आहे