
पुणे दि. 16 : पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या मतमोजणीदरम्यान आज मोठा गोंधळ उडाला. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांच्या नेत्या रूपाली ठोंबरे पाटील यांनी मतमोजणी प्रक्रियेवर गंभीर आरोप करत थेट मतमोजणी केंद्रात हायव्होल्टेज ड्रामा केला. मतमोजणीत फेरफार होत असल्याचा दावा करत त्यांनी निवडणूक निर्णय अधिकारी दबावाखाली काम करत असल्याचा आरोप केला.संतप्त रूपाली ठोंबरे पाटील यांनी सुरक्षा कठडे तोडून संरक्षक लोखंडी जाळीवर चढत थेट ईव्हीएम मशीनजवळ उडी मारण्याचा प्रयत्न केला. या घटनेमुळे मतमोजणी केंद्रात प्रचंड तणाव निर्माण झाला. पोलिसांनी आणि उपस्थित कर्मचाऱ्यांनी वेळीच हस्तक्षेप करत त्यांना रोखल्याने मोठा अनर्थ टळला.या प्रकारामुळे काही काळ मतमोजणी प्रक्रिया थांबवण्यात आली होती. दरम्यान, पुण्यातील या घटनेचे व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून, राजकीय वर्तुळात तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. मतमोजणीतील पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत असतानाच प्रशासनाने परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी अतिरिक्त सुरक्षा तैनात केली आहे