
पुणे:पुणे महानगरपालिका निवडणुकीत काँग्रेसने अखेर खाते उघडले असून, प्रभाग क्रमांक १८-ड मधून काँग्रेसचे उमेदवार प्रशांत जगताप यांनी भाजपाच्या उमेदवाराचा पराभव करत दणदणीत विजय मिळवला आहे. अटीतटीच्या आणि चुरशीच्या लढतीत प्रशांत जगताप यांनी विजय खेचून आणत पुण्यात काँग्रेसला मोठे यश मिळवून दिले.या निवडणुकीत भाजपाकडून अभिजीत शिवरकर रिंगणात होते. अभिजीत शिवरकर हे माजी राज्यमंत्री बाळासाहेब शिवरकर यांचे पुत्र असून, ते ऐनवेळी काँग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश करून निवडणूक लढवत होते. मात्र, मतदारांनी पक्षांतराला नकार देत काँग्रेसचे उमेदवार प्रशांत जगताप यांना पसंती दिली.भाजपाविरोधात थेट लढत देत प्रशांत जगताप यांनी शिवरकरांचा पराभव केला असून, या विजयामुळे पुण्यातील राजकीय समीकरणांमध्ये महत्त्वाचा बदल घडल्याचे चित्र आहे.दरम्यान, याच प्रभागातून निवडणूक रिंगणात असलेल्या रत्नप्रभा जगताप या पराभवाच्या दिशेने असल्याची माहिती आहे.प्रशांत जगताप यांच्या विजयामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण असून, हा विजय आगामी राजकारणाच्या दृष्टीने महत्त्वाचा मानला जात आहे