
मुंबई/पुणे : जानेवारी २०२६ मध्ये पार पडलेल्या महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मराठी अभिनेत्री तेजस्विनी पंडित हिने मतदानानंतर सोशल मीडियावर केलेली एक पोस्ट सध्या जोरदार चर्चेत आहे. मतदानानंतर बोटाला लावण्यात येणारी अमिट शाई सहज पुसली जात असल्याच्या तक्रारी समोर येत असतानाच, तेजस्विनीने या मुद्द्यावर उपरोधिक भाष्य करत निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकतेवर प्रश्न उपस्थित केला आहे.“बाकी ह्या वर्षी त्या marker ची शाई निघून जाणार की लोकशाही?” असा सवाल तिने आपल्या पोस्टमधून उपस्थित केला आहे. या एका वाक्यामुळेच सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर चर्चा रंगली असून अनेक नागरिकांनी तिच्या मताशी सहमती दर्शवली आहे.यासोबतच, तेजस्विनी पंडितने आपल्या पोस्टमध्ये मराठी अस्मितेचा अभिमान व्यक्त केला आहे. “माझा जन्म महाराष्ट्रात झाला, माझे अस्तित्व मराठी भाषेमुळे आहे,” असे नमूद करत तिने मराठी भाषेचे आणि महाराष्ट्राचे महत्त्व अधोरेखित केले.मतदानाचे महत्त्व सांगताना तिने मतदारांना सतर्क राहण्याचे आवाहन केले. “ज्याच्या रक्तात मराठी सळसळते आणि ज्याच्या हृदयात आजन्म महाराष्ट्र विराजमान आहे, अशाच मराठी माणसासाठी मी माझे मत दिले,” असे तीने स्पष्ट केले.विशेष म्हणजे, या पोस्टमध्ये तिने कोणत्याही राजकीय पक्षाचे थेट नाव घेतले नसले, तरी राज ठाकरे यांचा फोटो शेअर करून अप्रत्यक्ष पाठिंबा दर्शवला आहे. त्यामुळे तिची भूमिका मराठी अस्मिता आणि मनसेच्या विचारधारेकडे झुकलेली असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.एकूणच, या पोस्टद्वारे तेजस्विनी पंडितने केवळ मतदानाचे आवाहन केले नसून, निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकता, अमिट शाईचा मुद्दा आणि मराठी अस्मितेचा प्रश्न एकाच वेळी अधोरेखित केला आहे.