मतदानानंतर हात धुवायचेही नाहीत का?महापालिका निवडणुकीतील ‘अमिट शाई’ वादावर नागरिकांचे गंभीर प्रश्न

पुणे दि. 16 : महापालिका निवडणुकीदरम्यान मतदानानंतर बोटावर लावण्यात आलेली अमिट शाई साधे हात धुतल्यानंतर पुसली गेल्याचे अनेक नागरिकांच्या लक्षात आले आहे. यासंदर्भातील व्हिडीओ समाजमाध्यमांवर व्हायरल झाल्यानंतर या प्रकरणाला वेगळीच कलाटणी मिळाली असून, अशा व्हिडीओंच्या प्रसारावर निवडणूक आयोगाकडून गुन्हे दाखल करण्याची धमकी दिली जात असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे.या पार्श्वभूमीवर, “आता नागरिकांनी मतदानानंतर हात सुद्धा धुवायचे नाहीत का?” असा संतप्त सवाल उपस्थित केला जात आहे. निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत असताना, दोषींवर कारवाई करण्याऐवजी तक्रारदारांनाच धमकावले जात असल्याची भावना नागरिकांमध्ये निर्माण झाली आहे.खरे तर अमिट शाई (Indelible Ink) ही अशी शाई असते की, एकदा लावल्यानंतर ती सहजपणे पुसता किंवा धुता येत नाही. निवडणुकांमध्ये दुहेरी मतदान रोखण्यासाठी या शाईचा वापर केला जातो. या शाईमध्ये प्रामुख्याने सिल्व्हर नायट्रेट (AgNO₃) हे रसायन असते, जे त्वचेतील प्रथिनांशी प्रतिक्रिया देऊन आतल्या थरात कायमस्वरूपी डाग तयार करते. त्यामुळे ही शाई साबण, पाणी, केमिकल किंवा ॲसिटोननेही निघत नाही. साधारणतः ही शाई ७ ते १४ दिवस त्वचेवर स्पष्टपणे दिसून राहते.जर महापालिका निवडणुकांमध्ये वापरण्यात आलेली शाई खरी आणि दर्जेदार अमिट शाई असती, तर ती साध्या हात धुतल्याने पुसली जाणे शक्यच नव्हते, असा तज्ज्ञांचा दावा आहे. त्यामुळे वापरण्यात आलेली शाई निकृष्ट, चुकीची किंवा मुदत संपलेली (एक्सपायर्ड) असण्याची शक्यता नाकारता येत नाही.या प्रकरणात निवडणूक आयोगाने नागरिकांवर गुन्हे दाखल करण्याची धमकी देण्याऐवजी, प्रत्यक्षात नेमके काय घडले, कुठे चूक झाली, शाई पुरवठा, साठवणूक किंवा वापर प्रक्रियेत त्रुटी होत्या का, याचा सखोल व पारदर्शक तपास करणे गरजेचे असल्याची मागणी केली जात आहे.लोकशाही व्यवस्थेचा पाया असलेल्या निवडणूक प्रक्रियेवरील जनतेचा विश्वास डळमळीत होऊ नये यासाठी सत्य लपवण्याऐवजी सत्य समोर आणणे, दोषींवर जबाबदारी निश्चित करणे आणि आवश्यक ती सुधारणा करणे अत्यावश्यक आहे, अशी तीव्र प्रतिक्रिया नागरिक व सामाजिक कार्यकर्त्यांकडून व्यक्त होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Call Now Button