पुणे महापालिका निवडणूक २०२६ : ४०११ मतदान केंद्रांवर शांततेत मतदान

पुणे, दि. 16 :मा. राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र यांच्या आदेशानुसार पुणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक सन २०२५-२६ अंतर्गत आज दिनांक १५ जानेवारी २०२६ रोजी शहरातील एकूण ४०११ मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रिया किरकोळ अपवाद वगळता अतिशय शांततामय वातावरणात पार पडली, अशी माहिती पुणे महानगरपालिकेच्या माहिती व जनसंपर्क कार्यालयामार्फत देण्यात आली आहे.या निवडणुकीची मतमोजणी उद्या शुक्रवार, दि. १६ जानेवारी २०२६ रोजी सकाळी १०.०० वाजता पुणे शहरातील १५ निवडणूक निर्णय अधिकारी यांनी निश्चित केलेल्या १५ ठिकाणी पार पडणार आहे. सर्व मतमोजणी केंद्रांवर आवश्यक ती प्रशासकीय, तांत्रिक व सुरक्षेची तयारी पूर्ण करण्यात आली असल्याचे उप आयुक्त, निवडणूक कार्यालय, पुणे महानगरपालिका यांनी स्पष्ट केले आहे.येरवडा-कळस-धानोरी, नगर रोड-वडगाव शेरी, शिवाजीनगर-घोले रोड, औंध-बाणेर, कोथरूड-बावधन, ढोले पाटील रोड, हडपसर-मुंढवा, वानवडी-रामटेकडी, बिबवेवाडी, भवानी पेठ, कसबा-विश्रामबागवाडा, वारजे-कर्वेनगर, सिंहगड रोड, धनकवडी-सहकारनगर तसेच कोंढवा-येवलेवाडी या विभागांमध्ये स्वतंत्र मतमोजणी केंद्र निश्चित करण्यात आले आहेत.दरम्यान, मतमोजणी केंद्रे तसेच स्वारगेट येथील गणेश कला क्रीडा रंगमंचावरील मध्यवर्ती मीडिया सेलमध्ये प्रवेशासाठी उमेदवार, त्यांचे प्रतिनिधी, पत्रकार व कॅमेरामन यांनी वैध ओळखपत्र सोबत ठेवणे बंधनकारक असल्याचे प्रशासनाकडून कळविण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Call Now Button