
पुणे, दि. 16 : “चित्रपट हा एकत्रितपणे पाहण्याचा अनुभव आहे. तो अनुभव जिवंत ठेवायचा असेल तर चित्रपट महोत्सव सुरू राहणे गरजेचे आहे. महाराष्ट्र शासन त्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करेल,” असे प्रतिपादन राज्याच्या सांस्कृतिक मंत्रालयाचे मुख्य सचिव किरण कुलकर्णी यांनी केले.
विद्यापीठ रस्त्यावरील ई-स्क्वेअर थिएटर येथे आयोजित भव्य सोहळ्यात २४ व्या पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे (PIFF 2026) उद्घाटन त्यांच्या हस्ते झाले. यावेळी दादासाहेब फाळके चित्रनगरीच्या व्यवस्थापकीय संचालक स्वाती म्हसे पाटील, एनएफडीसीचे व्यवस्थापकीय संचालक प्रकाश मगदूम, भारती विद्यापीठाचे कुलगुरू शिवाजीराव कदम, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी, ई-स्क्वेअर थिएटरचे संचालक हेमंत पंचाळे, तसेच आंतरराष्ट्रीय ज्यूरी सदस्य व विविध देशांचे कॉन्सुल जनरल उपस्थित होते.
एनएफडीसीचे व्यवस्थापकीय संचालक प्रकाश मगदूम म्हणाले की, भारत सरकारने ‘वेव्ह’ आणि ‘इंडिया सिने हब’ या माध्यमातून चित्रपट निर्मात्यांसाठी जागतिक व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे. तर स्वाती म्हसे पाटील यांनी ‘पिफ’मुळे पुण्याची सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळख अधिक भक्कम झाल्याचे सांगितले.
महोत्सवाचे अध्यक्ष व संचालक डॉ. जब्बार पटेल यांनी प्रस्ताविकात महोत्सवाचा इतिहास मांडत गुरुदत्त, व्ही. शांताराम आणि ऋत्विक घटक यांच्या स्मृतींना अभिवादन करण्यात येत असल्याचे सांगितले. यंदा १०३ देशांतील १३० चित्रपट दाखवले जाणार असून, या महोत्सवामुळे ग्रामीण भागातील तरुण दिग्दर्शक पुढे आले आणि मराठी चित्रपटसृष्टीला नवी दिशा मिळाल्याचे त्यांनी नमूद केले.
१५ ते २२ जानेवारी २०२६ या कालावधीत पुण्यातील १० स्क्रीनवर हा महोत्सव होत असून, उद्घाटनप्रसंगी महोत्सवाच्या थीम व कॅटलॉगचे अनावरण करण्यात आले. कार्यक्रमात निकिता मोघे दिग्दर्शित हिंदी गाण्यावरील नृत्य सादर झाले. माजी मंत्री सुरेश कलमाडी यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. अभिनेत्री श्रिया बुगडे व क्षितिज दाते यांनी सूत्रसंचालन केले.
उद्घाटनानंतर इटलीतील पावलो सोरेंटिनो दिग्दर्शित ‘ला ग्राझिया’ हा चित्रपट प्रदर्शित करण्यात आला.
महोत्सवासाठी ऑनलाईन नोंदणी www.piffindia.com
या संकेतस्थळावर तसेच सर्व थिएटर्सवर सुरू आहे.